नागपूर,
cognitive-image-art-exhibition : शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर यांच्या वतीने माजी विद्यार्थिनी आणि युवा चित्रकार अंजली अरुण बावसे यांच्या ‘कॉग्निटिव्ह इमेज’ या वैयक्तिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक, १३ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या कला दालनात थाटात पार पडले.
उद्घाटन सोहळ्यात प्रा. दीपक जोशी आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे यांची उपस्थिती होती. या वेळी प्राध्यापक, विद्यार्थी, कला रसिक आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रा. दीपक जोशी यांनी कला ही केवळ अभिव्यक्ती नसून ती कलाकाराच्या संवेदनशीलतेचा आणि अंतर्मनाचा आरसा असल्याचे सांगितले. अंजली बावसे यांच्या कलाकृतींमध्ये विचारांची खोली, आत्मचिंतन आणि रंगांमधून उमटणारी भावनात्मक ऊर्जा जाणवते, असे ते म्हणाले.
अधिष्ठाता डॉ. साबळे यांनी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कला प्रोत्साहनासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. ‘कॉग्निटिव्ह इमेज’ प्रदर्शनात अंजली बावसे यांच्या वीसहून अधिक कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या असून, त्या चित्रांमध्ये मनोवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण, अभिव्यक्तीतील मौलिकता आणि रंगसंगतीतील प्रयोगशीलता प्रकर्षाने जाणवते. हे प्रदर्शन १५ नोव्हेंबरपर्यंत, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर येथील कला दालनात, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.