नागपूर,
nagpur-news : दारू, मौजमजा, महागडे कपडे आणि हॉटेलमधील ऐशआराम यासाठी पैसे हवेत म्हणून तरुणाने चोरीचा मार्ग स्वीकारला. दोन अल्पवयीन मुलांना हाताशी धरत घरफोडी करणाऱ्या या अट्टल चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी अवघ्या काही तासांत गजाआड केले. अटकेतील आरोपीचे नाव पियूष उर्फ भांजे राजू शाहू (२१) असे आहे. त्याने आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने ४ नोव्हेंबरला झालेल्या घरफोडीची कबुली दिली आहे. हुडकेश्वर पोलीस हद्दीत राहणाऱ्या गीता रवि कुंभारे या महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून मुलीकडे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परतल्यावर त्यांना लोखंडी कपाट फोडलेले आणि त्यातील दोन लाखांचे दागिने गायब असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील १५० सीसीटीव्ही फूटेज तपासले असता पियूष संशयित म्हणून आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून पाच तोळे सोनं, चांदीचे दागिने आणि ओप्पो मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत पियूषने सांगितले की, “मौजमजेसाठी आणि खर्चिक सवयींसाठी पैसे हवेत म्हणूनच चोरीचा मार्ग स्वीकारला.” पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून, दोन अल्पवयीन साथीदारांवरही बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.