‘स्वदेशी आत्मनिर्भर संकल्प रथयात्रेच्या शुभारंभ १५ नोव्हेंबरला

13 Nov 2025 19:38:34
नागपूर, 
nagpur-news : स्वदेशी, आत्मनिर्भर भारत आणि ‘वोकल फॉर लोकल’चा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट), नवी दिल्ली आणि स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वदेशी आत्मनिर्भर संकल्प रथयात्रा’ देशभर सुरू करण्यात येत आहे. या यात्रेचा पहिला टप्पा दिनांक १५ नोव्हेंबर रोजी नागपूर (विदर्भ) येथून प्रारंभ होणार असून, धंतोलीतील गोरक्षण सभेच्या आवारातून सकाळी ११ वाजता या यात्रेला शुभारंभ करण्यात येईल.
 
 
 
cait
 
 
 
ध्वजारोहण सोहळा खासदार आणि कैटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, कैटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारत्या, विपुल त्यागी, कॅप्टन खत्री आणि स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय सह-संयोजक सतीश यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, ही रथयात्रा स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा विचार देशभर पोहोचवणारी जनचळवळ ठरेल. स्वदेशी स्वीकारणे म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरण नाही, तर राष्ट्राच्या आत्म्याला बळकटी देणारी प्रतिज्ञा असल्याचे ते म्हणाले. खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी स्वदेशीला राष्ट्रीय पुनर्जागरणाचा मार्ग म्हणून संबोधित केले. त्यांनी सांगितले की व्यापार, उद्योग, शिक्षण आणि उपभोग या सर्व क्षेत्रांमध्ये स्वदेशी मूल्यांना प्राधान्य दिल्यास भारत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल आणि जागतिक स्तरावर सशक्त राष्ट्र म्हणून उभा राहील.
 
ही रथयात्रा विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार असून, व्यापारी, स्वदेशी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वदेशी जागरण मंच व कैट सदस्य रथाचे स्वागत करतील. दररोज रथ ४-५ गावांना भेट देईल. एलइडी प्रोजेक्टर, स्वदेशी गीत, घोषवाक्ये, जनजागृती पत्रके आणि प्रतिज्ञा फॉर्म यांनी सुसज्ज हा रथ स्वदेशीचा संदेश गावागावात पोहोचवणार आहे. व्यापारी संघटनांच्या सहकार्याने रात्री मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था केली जाईल. समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्याला जबाबदारी देण्यात आली असून, राजीव खंडेलवाल (मध्यप्रदेश व विदर्भ) आणि अमर परवानी (छत्तीसगड) यांच्याकडे माहिती केंद्र राहील. ही यात्रा स्वदेशी विचारसरणीचा प्रसार, स्थानिक व्यापाराचे सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याकडे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0