नागपूर,
mangalsutra-theft : शहरात पायदळ जात असलेल्या महिलेला लुटणाऱ्या सोनसाखळी चोरट्याला अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने ही कारवाई करत ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेत घेतलेल्याचे नाव राहुल अशोक चव्हाण (२५, प्लॉट क्र. १७, बापुजी अणेनगर, यशोधरानगर) असे आहे.

फिर्यादी आशा विनायक सांगोळे (५९, प्लॉट क्र. १८१, काशीनगर, नारी रोड, कपिलनगर) या १ नोव्हेंबर रोजी दुपारी आपल्या घराजवळून ऑटोने इंदोरा चौकात गेल्या होत्या. ऑटोतून उतरल्यानंतर त्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १० नंबर पुलियाजवळून पायदळ जात असताना, दुचाकीवरून मागून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यावर थाप मारून सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या घटनेनंतर पाचपावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीचा मागोवा घेत आरोपी राहुल चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, सोन्याचे पेंडन्ट, मणी आणि मोबाईल फोन असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून आरोपीच्या इतर गुन्ह्यांतील सहभागाचीही चौकशी केली जात आहे.