नागपूर,
theft in bullion shops : शहरातील हिंगणा परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा सराफा बाजाराला टार्गेट केले आहे. जवळजवळ असलेल्या दोन सराफा व्यावसायिकांच्या दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश करत चोरट्यांनी सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, कुही येथे राहणारे साहिल शामकुमार वर्मा (२५) यांचे हिंगणा येथील बाजार चौकात, ताज हॉटेललगत साई ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी साहिल वर्मा यांच्या दुकानासह लगतच्या दुसऱ्या सराफा दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी वर्मा यांच्या दुकानातून सोन्याचे मणी, खडे, चांदीचे दागिने, १० हजार रुपये रोख रक्कम आणि सीसीटीव्ही डिव्हीआर चोरून नेले. तसेच शेजारील दुकानातून १२ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. अशा प्रकारे एकूण सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलला. घटनेनंतर व्यापाऱ्यांनी हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस हवालदार गायकवाड यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.