जगाला दिशा देणारे शास्त्रज्ञ बना : विकास मीना

13 Nov 2025 20:42:51
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
vikas-meena : आज आपण संपर्क व संदेशवहन क्षेत्रात प्रचंड क्रांती झालेली पाहतो. त्यामागे शास्त्रज्ञांचे कठोर परिश्रम आहेत. शास्त्रज्ञ म्हणून पुढे येण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकाटी आणि यश प्राप्तीपर्यंत परिश्रमाची तयारी असावी लागते. केलेले संशोधन सामान्यांना परवडायलाही हवे. संशोधनाच्या क्षेत्रात विद्यार्थी, युवक पुढे येत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्याची गरज आहे. मुलांनी नोकरी करणाèयापेक्षा नोकरी देणारी व्यक्ती बनण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. मुलांनो, जगाला दिशा देणारे शास्त्रज्ञ बना,’ असा सल्ला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी येथे दिला.
 
 
 
y13Nov-Meena
 
 
 
13 व 14 नोव्हेंबर रोजी यवतमाळात आयोजित यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्हास्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एनआयसीच्या शास्त्रज्ञ शिवाणी सिंग, संस्थेचे सचिव विजय कासलीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, गट शिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, विवेकानंदाच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
 
 
 
दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी, भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तसेच विशुद्ध विद्यालयाचे वतीने आयोजित इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा उद्देश सांगितला.
 
 
विजय कासलीकर यांनी मुले भविष्यातील शास्त्रज्ञ बनणार आहेत म्हणून सर्वांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात विनायक दाते यांनी, विज्ञानाच्या युगात मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरिता अशा प्रकारच्या प्रदर्शनाला खूप महत्त्व आहे. ही सुरुवात असून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सांगितले.
 
 
संगीत शिक्षक पूर्णा खानोदे व विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. शिक्षण विभागातील योगेश डाफ, वंदना नाईक, अनिल शेंडगे, स्मिता घावडे, दीपिका गुल्हाने यांनी मंचावरील उपस्थितांचे वैज्ञानिक गुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. संचालन वैशाली ठाकरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुळकर्णी यांनी केले.
 
 
यावेळी संगीता वेणूरकर, ऋतुजा गुल्हाने या परीक्षकांसोबतच आयोजन समितीतील शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच स्वागत समितीतील अध्यापक मंडळ व संघटनांचे पदाधिकारी, बाल वैज्ञानिक, त्यांचे मार्गदर्शक उपस्थित होते.
 
क्षणचित्रे :
इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात 161 बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती आणल्या आहेत.
उद्घाटन समारंभाकरता उपस्थित पाहुण्यांना रोबोटची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर घोष पथकाच्या गजरात आणले.
मंगल वेषातील मुलींनी त्यांचे औक्षण केले.
स्वागतासाठी वैज्ञानिक गुच्छ तयार केला होता.
तीन जिल्ह्यांच्या या प्रदर्शनाच्या तयारीसाठी विविध प्रकारच्या समित्या केल्या आहेत.
उपस्थित सर्वांसाठी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले आहेत.
Powered By Sangraha 9.0