ढाका,
Violence in Bangladesh बांगलादेशात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील गुन्हेगारी खटल्याचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी ढाका आणि देशातील इतर भागात तणावाचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजधानीसह अनेक ठिकाणी जाळपोळ आणि कच्च्या बॉम्बच्या हल्ल्यांच्या घटना घडत असून, २०२४ मधील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनांची आठवण पुन्हा जागी झाली आहे. त्या आंदोलनात ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

गुरुवारी शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने “ढाका लॉकडाऊन” ची हाक दिल्यानंतर संपूर्ण शहराला पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी अक्षरशः किल्ल्यात रूपांतरित केले आहे. पोलिस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) चे शेकडो जवान शहरात तैनात करण्यात आले आहेत. शहराच्या प्रवेशद्वारांवर अनेक तपासणी नाके उभारण्यात आले असून प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी केली जात आहे. सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध असून नागरिकांना सतत सावधानतेचा इशारा दिला जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) शेख हसीना आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवरील आरोपांवर निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित केल्यानंतर सुरक्षा अधिकच कडक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान हसीना यांच्यावर खून, कट रचणे आणि सत्तेचा गैरवापर यांसारखे अनेक गंभीर आरोप आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी भारतात आश्रय घेतल्याची माहिती समोर आली होती.
राजकीय तणाव वाढत असल्याने ढाकामध्ये सामान्य जीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. वाहतुकीवर परिणाम झाला असून, अनेक व्यापारी आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. राजधानीबाहेर गाजीपूर आणि ब्राह्मणबारिया यांसारख्या शहरांपर्यंत हिंसाचाराचा लोट पोहोचला आहे. ब्राह्मणबारियातील ग्रामीण बँकेच्या एका शाखेला आंदोलकांनी आग लावली, ज्यात संपूर्ण फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाली. ही ग्रामीण बँक १९८३ साली नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांनी स्थापन केली होती. गरिबांना सूक्ष्म कर्ज पुरविणाऱ्या या संस्थेचे आजचे प्रमुख युनूस सध्या बांगलादेशच्या अंतरिम प्रशासनाचे नेतृत्व करत आहेत. मात्र देशातील वाढत्या हिंसाचारामुळे आणि राजकीय अस्थिरतेमुळे त्यांच्या नेतृत्वालाही मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. बांगलादेश सध्या राजकीय उकळीच्या टप्प्यावर आहे. एकीकडे शेख हसीना यांच्या खटल्याचा निकाल, तर दुसरीकडे आंदोलनं आणि हिंसाचारामुळे देशाच्या स्थैर्यावर मोठं संकट निर्माण झालं आहे.