अमरावती,
abvp-amravati-university : अमरावती विद्यापीठातील प्रवेश, परिणाम, पाठ्यक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यांसारख्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढला व विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सादर केले. मोर्चा संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील मैदानावरून सुरू झाला होता.

विद्यापीठाचे अकॅडेमिक कॅलेंडर सर्व बाबींचा सारासार विचार करून बनविण्यात यावे, प्रवेशाची अंतिम तारीख १५ ऑगस्ट असावी आणि त्या आधारावर कॅलेंडर तयार करण्यात यावे. त्यानंतर वर्षभर त्याचे तंतोतंत पालन केले जावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना सोईस्कर ठरेल, अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी व प्रवेशासंबंधी सर्व सूचना विद्यार्थ्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर देण्यात याव्या, प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सहज व्हावी, याकरिता तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या छात्रसंघ निवडणुका तातडीने घेण्यात याव्या. प्रवेश प्रक्रियेत एजंट्स, ब्रोकर आणि तत्सम गैरप्रकारांचा वाढता प्रभाव दिसून येत आहे आणि याविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाद्वारे कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा प्रवेशादरम्यान होणार्या गैरप्रकारांविरुद्ध ठोस उपाययोजना करण्यात याव्या, वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवताना निकषांत पारदर्शकता नाही. या अनुषंगाने जे कायदे व नियम बनवले आहेत, त्याचे व्यवस्थित पालन होत नाही.
त्यामुळे शुल्क ठरवताना पारदर्शकता असावी, मिळालेली माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, परीक्षांचे निकाल आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर लागत नाही व पुनर्मूल्यांकन तसेच मूळ तपासणीच्या निकालात तफावत दिसून येते. यासंबंधी जे दोषी असतील, त्याशिक्षक व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात यावे, परिक्षा केंद्रांवर नियुक्त झालेले शिक्षक दोन ते तीन महिने परीक्षेत गुंतलेले असल्याने शिकवण्यासाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर शिक्षक फक्त १५ दिवसांसाठी नियुक्त करण्यात यावे, दर १५ दिवसांनी ही जबाबदारी नवीन शिक्षकांना देण्यात यावी. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतील आदी ३४ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी सभास्थळी येऊन निवेदन स्विवकारले व विद्यार्थांशी संवाद साधला.
उपरोक्त विद्यार्थी केंद्रित महत्त्वाच्या विषयांना घेऊन अभाविपने विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या जाहीर सभेत प्रदेश मंत्री पायल किनाके म्हणाल्या की, अमरावती विद्यापीठाप्रमाणेच नागपूर विद्यापीठाची शिक्षणाची ढासाळलेली गुणवत्ता लक्षात घेता प्रशासनाला छात्रशक्तीची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. छात्रशक्ती एक झाली तर राष्ट्रशक्ती कशी बनवू शकते हे सिद्ध करायचे आहे. सभेचे संचालन अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख यांनी केले तर यावेळी अमरावती विभाग संयोजक ऋषभ गोहणे, महानगर सहमंत्री गौरी भारती, अचलपूर जिल्हा संयोजक ओम धोटे, अॅग्रीविजन प्रांत संयोजक चंद्रकांत बोबडे, मलकापूर नगर मंत्री प्रगती वानखेडे, वाशीम नगर मंत्री ऋषिकेश मानवटकर, मोहदा नगर मंत्री अंशीत वर्मा यांच्यासह अमरावती विद्यापीठातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ जिल्ह्यामधून सुमारे ५००० विद्यार्थी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.