नागपूर,
science-exhibition : भारतीय विद्या भवन सिव्हिल लाइन्स शाळेत सीबीएसईतर्फे आयोजित प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी मोठ्या उत्साहात झाले. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. “विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित – स्वावलंबी भारताची पायाभरणी” या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात डॉ. वटे यांनी प्राचीन भारतापासून आधुनिक संशोधनापर्यंतच्या प्रवासाची माहिती देत विद्यार्थ्यांना नवनवीन शोधांसाठी प्रेरित केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘आरंभ है प्रचंड’ आणि ‘उदो उदो आईचा’ या नृत्यांद्वारे वातावरण रंगवले.

या द्विदिवसीय विज्ञान प्रदर्शनात शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकला पर्याय, उदयोन्मुख तंत्रज्ञान, गणितीय प्रतिकृती, आरोग्य-स्वच्छता, जलसंवर्धन या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. वर्ग ६ ते ८ आणि ९ ते १२ या दोन गटांसाठी स्वतंत्र सादरीकरणे ठेवण्यात आली. नागपूर आणि परिसरातील ५५ शाळांतून ११९ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण प्रतिकृती आणि प्रयोग सादर केले. पहिल्या दिवशी भारतीय विद्या भवन नागपूर केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित, सचिव डॉ. सुनंदा सोनारीकर, कार्यकारी समिती सदस्य पद्मिनी जोग, समन्वयक अंजू भुटानी, तसेच विविध शाळांचे प्राचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. भवन्स सिव्हिल लाइन्सच्या प्राचार्या श्रीमती लीना वर्गीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विज्ञान विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.