पाटणा,
Bihar BJP is the largest party बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणांची मोठी उलथापालथ होत असून, एनडीए प्रचंड आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २४३ जागांपैकी २०० हून अधिक जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर असून भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाचे तब्बल ९१ उमेदवार आघाडीवर आहेत, तर नितीश कुमार यांच्या जदयूला ८१ जागांवर आघाडी मिळत आहे. चिराग पासवान यांच्या एलजेपी (रामविलास) चे २१ उमेदवार पुढे आहेत, तर मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाच्या ५ जागांवर विजयाची शक्यता दिसत आहे.

दुसरीकडे, महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या राजदला फक्त २६ जागांवरच आघाडी दिसत आहे, तर काँग्रेसचा स्थिती आणखीच बिकट असून पक्ष केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे. ओवेसी यांच्या AIMIM ला ५ जागांवर आघाडी आहे, तसेच छोट्या पक्षांनाही काही ठिकाणी वाढलेले समर्थन मिळताना दिसते. एनडीएच्या जागावाटपाचा विचार करता भाजपा आणि जदयू प्रत्येकी १०१ जागांवर उतरले होते, तर चिराग पासवान यांनी २९ जागांवर उमेदवार उभे केले होते. एनडीएने एकत्रितपणे मिळवलेली आघाडी पाहता पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचेच सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या सगळ्या चित्रात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र नितीश कुमार यांचा पक्षही मजबूत कामगिरी करत असल्याने त्यांचीच सत्ता टिकवून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिराग पासवान यांचे २० पेक्षा जास्त उमेदवार पुढे असल्याने तेही ‘किंगमेकर’ ठरू शकतात.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार भाजप स्वतंत्रपणेही ९१ जागांवर आघाडीवर असल्याने, चिराग पासवान यांच्या २२ जागा, मांझी यांच्या ५ जागा आणि आरएलएमच्या ४ जागा मिळून बहुमताचा आकडा सहज पार होऊ शकतो. त्यामुळे नितीश कुमारांशिवायही आणि महाआघाडी न मोडताही सरकार स्थापन करण्याची क्षमता भाजपकडे असल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे. बिहारचे राजकारण नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असून, अंतिम निकालांसह मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.