नाशिक,
Uddhav Thackeray : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गदारोळ सुरू आहे. निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून, मतदान २ डिसेंबर रोजी आणि निकाल ३ डिसेंबरला येणार आहेत. यानंतर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे, तर पक्षांतराला देखील गती मिळाली आहे. नेते आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा झटका बसला आहे.
नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाझे यांचे सख्खे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे महत्त्वाचे कारण म्हणजे हेमंत वाजे सिन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार होते. भाजपने या उमेदवाराला आपल्या पक्षात घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.
हेमंत वाजे यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत, तसेच गटनेता आणि उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या आई रुक्मिणी वाजे या आमदार होत्या, तर वडील देखील नगराध्यक्ष होते. भाजपाच्या या रणनीतीत मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या खेळीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटालाही मोठा झटका बसला आहे. अजित पवारांच्या पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी हेमंत वाजे एवढा तुल्यबळ उमेदवार उपलब्ध नाही, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि माणिकराव कोकाटे यांना या मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यता आहे.
सध्या परिस्थिती अशी आहे की, भाजपकडून हेमंत वाजे यांनाच नगराध्यक्षपदाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा झटका ठरल्याचे समजते आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा मोठा प्रभाव पडणार असल्याची दखल घेतली जात आहे.