वर्धा,
harveer-singh : माळढोक, तणमोर, सारस यासारखे पक्षी दुर्मिळ झाले असून पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी आज वनविभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक हरवीर सिंह यांनी सालोड हिरापूर येथे आयोजित पक्षीसप्ताहाच्या समारोप समारोहात केले.
बहार नेचर फाउंडेशनद्वारे सालोड येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वनौषधी उद्यानात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे होते. या समारोहाला आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भरत राठी, दत्ता मेघे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पेठे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, मानद वन्यजीव रक्षक तथा बहारचे उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, दीपक गुढेकर, संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, मार्गदर्शक अतुल शर्मा, आयुर्वेद महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. गौरव सावरकर, मेघे अभिमत विद्यापीठातील रासेयो विभागाचे संयोजक डॉ. अमित रेचे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. किशोर वानखडे म्हणाले, पक्षी म्हटले की आपल्याला केवळ झाड आठवते. मात्र, जंगलांसोबतच ओसाड माळरान, गवताळ प्रदेश, टेकड्या, तलाव, नदीनाले, पानथळ व दलदलीच्या जागा, सागर किनारे या सर्व ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास असून त्याचेही संरक्षण आपण केले पाहिजे. अतुल शर्मा यांनी, जीवन समृद्ध करायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या गरजा मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. तर, निसर्गावर प्रेम करायला लागलो की आपण आपोआपच पर्यावरणाचे संरक्षक बनत जातो, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबाजी घेवडे यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. अनिल पेठे व डॉ. भरत राठी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमात प्रारंभी संजय इंगळे तिगावकर यांनी बहारच्या वाटचालीतील महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख करीत या पक्षीसप्ताहात आयोजित नियमित पक्षीनिरीक्षण व जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेतला. संचालन स्नेहल कुबडे यांनी केले, तर आभार सहसचिव देवर्षी बोबडे यांनी मानले.
कार्यक्रमापूर्वी सकाळी सालोड येथील तलावावर आयोजित पक्षीनिरीक्षण उपक्रमात लीला पूनावाला फाउंडेशनमधील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनी तसेच सालोड येथील नेहरू विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात बहारचे कोषाध्यक्ष राजदीप राठोड, दर्शन दुधाने, घनश्याम माहोरे, अॅड. पवन दरणे, याकुब शेख, निवास उरकुडे, वनरक्षक मनेशकुमार सज्जन, सूरज बोदिले, राकेश काळे, सुषमा सोनटके तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.