वर्धा,
wardha-election : जिल्ह्यातील सहा नगर परिषदमध्ये निवडणूक होत आहे. यात सिंदी रेल्वे, वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी आणि पुलगाव या नगर परिषदांचा समावेश आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची चर्चा गेल्या चार महिन्यात चांगलीच रंगली. त्यामुळे जिल्ह्यात नेमके कुठे मतदार यादीत घोळ झाला आहे काय? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. अशात निवडणूक आयोगाने दोनवेळा मतदार यादीत नाव आलेल्या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार लावून हा तिढा सोडण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार जिल्ह्यात सहाही नगर परिषदेमध्ये एकूण सहाही ठिकाणी मिळून यादीमध्ये ३ हजार ११७ नावांपुढे दोन स्टार लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी जिल्ह्यात एक नगराध्यक्ष आणि तीन सदस्यपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. पुलगाव नगर परिषदेत मतदार यादीत असलेल्या एकूण २९ हजार ६५ नावांपैकी ५१९ नावांपुढे दोन स्टार लागले आहे. म्हणजेच मतदार यादीत दोनवेळा नावे आली आहेत. हिंगणघाट नगर परिषद अंतर्गत १ हजार ६५६ नावांपुढे दोन स्टार लागले असून येथे एकूण मतदार संख्या ९४ हजार ३६९ इतकी आहे.
वर्धा नगर परिषदेत ८८ हजार १३ इतके मतदार असून येथे ६३६ नावापुढे दोन स्टार आहे. आर्वी येथे १९५ नावापुढे दोन स्टार असून येथे एकूण मतदार संख्या ३६ हजार ४०७ इतकी आहे. तर देवळी येथे १११ नावापुढे दोन स्टार लागले आहे. सिंदी रेल्वे नगर परिषदमध्ये मात्र अद्याप दोन स्टार असलेली नावे मतदार यादीत नसल्याची माहिती पुढे आली आहे.