नवी दिल्ली,
Cold wave alert for seven states देशभरात हिवाळ्याची चाहूल तीव्र होत असून, उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांत तापमान झपाट्याने घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १४ नोव्हेंबरसाठी सात राज्यांना तीव्र शीतलहरीचा इशारा देण्यात आला असून, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सकाळी जोरदार थंड वारे वाहणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांबरोबरच विशेषतः मुलांनी आणि वृद्धांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्व भारतातील बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. अनेक भागात वाहणारे बोचरे वारे लोकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत करू शकतात. डोंगराळ प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली असून, पर्यटकांना तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही शीतलहर १५ नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी जाणवेल. दिल्ली आणि हरियाण्यातही गुरुवारी सकाळी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. घराबाहेर पडताना उबदार कपडे वापरणे आवश्यक असल्याचा हवामान खात्याचा सल्ला आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमधील उंच भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते निसरडे होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस, तर किमान ११ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे शहरात धुक्याचे प्रमाण वाढू शकते आणि वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो. उत्तर प्रदेशातही थंडीची लाट धडकण्याची चिन्हे दिसत असून, सकाळच्या वेळात धुके आणि तापमानातील घट कायम राहणार आहे. लखनौमध्ये कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत वाहणारे प्रखर थंड वारे दैनंदिन कामांवर परिणाम करू शकतात. डोंगराळ राज्यांतील परिस्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, उत्तराखंड व हिमाचलमध्ये १४ नोव्हेंबर रोजी बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. नैनिताल, रुद्रप्रयाग आणि चमोली यांसारख्या भागांत तापमान सरासरीपेक्षा बरेच खाली जाण्याची शक्यता आहे. डेहराडूनमध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअस, तर नैनितालमध्ये ७ अंश सेल्सिअस राहू शकते. हवामान खात्याने लोकांना आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.