आगीत डेकोरेशनचे साहित्य व घर जळून खाक

14 Nov 2025 16:51:12
गडचिरोली, 
Decoration materials तालुक्यातील पोर्ला येथील जुन्या वस्तीत असलेल्या आंबेडकर वॉर्डातील सोनटक्के यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील डेकोरेशनचे सामान व संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात सोनटक्के यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पोर्ला येथील बाळकृष्ण बळीराम सोनटक्के हे गेल्या अनेक वर्षांपासून डेकोरेशनचा व्यवसाय करीत आहेत. याच भरोशावर सोनटक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेले असताना अचानक सोनटक्के यांच्या डेकोरेशन ठेवलेल्या खोलीला आग लागली. हळूहळू आगीचा भडका उडू लागला.
 
 
Decoration materials
 
 
आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर सोनटक्के कुटुंबीयांना जाग आली. तोपर्यंत आगीचा भडका उडाला होता. आगीने संपूर्ण घर काबिज केल्याने खोलीत ठेवलेल्या डेकोरेशनचे साहित्य, डिजेचा संच, मंडप पडदे, प्लास्टिक खुर्च्या जळून खाक झाल्या. आगीच्या भडक्यामुळे घरातील जीवनावश्यक साहित्य देखील जळून खाक झाले. यात सोनटक्के यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आग लागल्याचे कळताच संपूर्ण गाव जागे झाल्याने गावकर्‍यांनी एकच गर्दी केली होती. सुदैवाने शेजारील घरांना आगीचा फटका बसला नाही व जिवितहानी झाली नाही.
Powered By Sangraha 9.0