बुलढाणा,
digital-arrest-fraud-case : सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजल्या जाणार्या डिजीटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणात बुलडाणा सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. तक्रारदार विनोदकुमार उत्तमराव साळोक (वय ४२) आणि त्यांची पत्नी यांना खोट्या सीबीआय व ट्राई विभागाच्या नावाने धमकी देत त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून १० लाख रुपये ऑनलाईन भरावयास लावून फसवणूक करण्यात आली होती.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ते २४ ऑगस्ट या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एसीस बँक मधील ग्लोबल टिंबर्स नावाच्या खात्यात आरटीजीएसद्वारे १० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. यावरून दि. २५ ऑगस्ट रोजी सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा येथे गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तातडीने संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून आरोपींच्या खात्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली. फसवणूक केलेले पैसे विविध खात्यांत वळविण्यात आले असल्याचे समोर आले. तपास पथकाने त्वरित ही सर्व खाती गोठविण्याची (ऋअॅशशूश) प्रक्रिया केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींनी वळवलेली तक्रारदारांची रक्कम मिझोरम राज्यातील एका बँक खात्यात गेल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करत त्या खात्यातील तब्बल ९ लाख ९४ हजार ३०० रुपये रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशानुसार ती तक्रारदारांच्या बँक खात्यात दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या परत मिळवून देण्यात आली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर, तपास अधिकारी पो. नि. संग्राम पाटील, सपोनि प्रमोद इंगळे, पोहेकॉ रामेश्वर मुंढे, प्रशांत गावंडे, राहुल इंगळे आणि केशव पुढे यांच्या पथकाने केली.