देशातील पहिला ‘फिकल स्लज’ प्रकल्प नीरीकडून चंद्रपूर मनपाकडे हस्तांतरित

14 Nov 2025 20:12:39
नागपूर,
Fecal Sludge Project : सीएसआयआर–नीरीने विकसित केलेला देशातील पहिलाच अत्याधुनिक फिकल स्लज अँड सेप्टेज मॅनेजमेंट प्रकल्प औपचारिकरीत्या चंद्रपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला. सीएसआयआर चे महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी यांच्या हस्ते हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. ‘मेकॅनिकल डीवॉटरिंग अँड ड्रायिंग सिस्टम’ या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प भारत–युरोपियन युनियन होरायझन २०२० अंतर्गत तयार करण्यात आला असून “पॅव्हिट्र” प्रकल्पातून तो आकारास आला आहे. डॉ. कलैसेल्वी यांनी हे तंत्रज्ञान मूल्यवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि प्रभावी मल-अवसाद व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगत चंद्रपूर मनपाचे कौतुक केले. त्यांनी हे मॉडेल देशातील इतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनीही स्वीकारावे, असे आवाहन केले.
 
 
Fecal-sludge-prakalp
 
प्रकल्पप्रमुख डॉ. गिरीश पोफळी यांनी सादरीकरणात सांगितले की हा देशातील सर्वाधिक क्षमतेचा एफएसएम प्रकल्प असून प्रथमच फिकल स्लजचे एफसीओ मानकांनुसार जैविक खतामध्ये रूपांतर करणारी प्रणाली येथे उभारण्यात आली आहे. नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांनी शहरी भागांत अशा प्रकल्पांची वाढती गरज अधोरेखित केली. चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त सौ. विद्या गायकवाड यांनी नीरी आणि डीएसटीचे आभार मानत तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी कायम राखण्याची ग्वाही दिली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी प्रकल्पाच्या स्थानिक अंमलबजावणीचा आढावा सादर केला. नीरीने एमडीडीएस संचालन व देखभाल मार्गदर्शक तत्त्वे आणि एसओपी चे मॅन्युअलही मनपाला सुपूर्द केले. हा प्रकल्प शाश्वत शहरी स्वच्छतेकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0