‘नव्यांना संधी, जुन्यांना विश्रांती’चा सूर

14 Nov 2025 18:22:56
गोंदिया, 
Gondia Municipal Council Election दीर्घ प्रतीक्षेनंतर नगरपरिषदेची निवडणूक २ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. उमेदवारीवरून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नव्या चेहर्‍यांसह अनुभवी नगरसेवकांनीही आपले नशिब आजमावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र यंदा ‘नव्यांना संधी, जुन्यांना विश्रांती’, असा स्पष्ट सूर राजकीय पक्षांमध्ये उमटताना दिसत आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून प्रभागनिहाय उमेदवार निवड प्रक्रियेची चाचपणी सुरू आहे. मागील निवडणुकीत विजयी ठरलेल्यांपैकी अनेक नगरसेवकांना यावेळी बाजूला ठेवून नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या वाढत असून, स्पर्धा अधिकच चुरशीची होणार हे निश्चित आहे. येथील नगरपरिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये पुर्णत्वास आला. यानंतर दीर्घ कालावधीनंतर निवडणूक जाहीर झाली.
 
 

गोंदिया नगरपरिषद  
 
 
गत काळातील कामगिरीवर व शहराच्या विकासावर नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नगरपालिकेची मुदत संपल्यानंतरच्या प्रशासक काळात अनेक माजी नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात विकासकामांना गती दिली, तर काही मात्र पूर्णपणे गायब राहिल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशा कामचुकार नगरसेवकांविषयी मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या नाराजीचा फटका पक्षांना बसू नये म्हणून पक्ष नव्या उमेदवारांवर भर देत आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुण कार्यकर्ते, महिला उमेदवार आणि व्यावसायिक क्षेत्रातील नवोदित चेहर्‍यांचा मोठा सहभाग दिसून येतोय. त्यामुळे गोंदियाच्या राजकारणात नवीन पिढीचा प्रभाव वाढताना दिसतो आहे. राजकीय सूत्रांनुसार, उमेदवार निवडताना स्थानिक मतदारसंघातील जातीय संतुलन, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि मागील कामगिरी या घटकांचा नीट विचार करत आहेत. येत्या दोन दिवसांत अंतिम उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रचाराला खर्‍या अर्थाने रंग चढणार आहे.
 
 
इच्छुकांची वाढलेली रांग; नेत्यांसाठी डोकेदुखी
प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उमेदवारी ठरविण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकले आहे. उमेदवारी एका व्यक्तीलाच मिळणार असताना असंख्य कार्यकर्ते रिंगणात आहेत. सध्या प्रत्येक इच्छुकांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल या आशेवर असून त्यांनीही वैयक्तीक गाठीभेटी वाढवल्या आहेत. आपल्यासोबत किती युवकांची फळी आहे, राजकीय, सामाजिक ताकद ही दाखवण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे. मात्र उमेदवारी न मिळालेल्यांची नाराजी व्यक्त होण्याची शक्यता असून, त्यांची मनधरणी आणि संघटन टिकवून ठेवणे हे नेत्यांसाठी मोठे कसोटीचे ठरणार आहे.
 
 
भाऊ आपल्या प्रभागातून उमेदवार कोण?
नाराजीचा फटका थेट गटबाजीच्या स्वरूपात बसू नये, यासाठी नेत्यांना सर्वसमावेशक आणि सर्वानुमते उमेदवार निश्चित करण्याचे कसब दाखवावे लागणार आहे. उमेदवारीसाठीची हालचाल जोमात असून, नेत्यांची धावपळ वाढली आहे. संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. प्रत्येक इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेवर कागदपत्रे, मतदार याद्या, गाठीभेटीत व्यस्त आहे. चर्चा सर्व उमेदवारांची असली तरी अंतिम निर्णय गट प्रमुख नेते घेणार असल्याने मतदार, कार्यकर्त्यांत एकच चर्चा आहे ती म्हणजे ‘आपल्या प्रभागातून उमेदवार कोण?’
Powered By Sangraha 9.0