नागपूर,
mp-cultural-festival : ‘हरी म्हणा, कुणी गोविंद म्हणा, हरी नारायणा’ या हरिनामाच्या गजरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात शुक्रवारी भाविक तल्लीन झाले. खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत आयोजित ‘जागर भक्तीचा’ उपक्रमात विष्णू सहस्त्रनामाचे सामूहिक पठण भक्तिभावाने पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा ११ वेळा उच्चार करण्यात आला. त्यानंतर एकात्मता मंत्र आणि ‘यस्य स्मरणमात्रेण…’ या श्लोकाच्या मंत्रोच्चारातून विष्णू सहस्त्रनाम पठणाला प्रारंभ झाला आणि परिसरात दिव्य, शांत आणि भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ संस्कार भारती विदर्भ प्रांत अध्यक्षा कांचनताई गडकरी, पुजनीय भगीरथ महाराज, चित्राताई जोशी, करुणा साठे, वसुधा खटी, प्रा. अनिल सोले, डॉ. दीपक खिरवडकर आणि अविनाश घुशे यांच्या उपस्थितीत झाला. विष्णू सहस्त्रनाम पठण हा मनाला शांती देणारा, सकारात्मकता निर्माण करणारा आणि अध्यात्मिक उन्नती साधणारा उपक्रम असल्याचे वनवासी कल्याण छात्रावासाच्या व्यवस्थापिका चित्राताई जोशी यांनी सांगितले. नियमित अध्यात्मिक आयोजनाबद्दल त्यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कौतुक केले. अविनाश घुशे यांनी भक्तांना साप्ताहिक अध्यात्मिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव–पत्ता नोंदणी करण्याचे आवाहन केले.