अर्जुनी मोरगाव,
Kohli community cargo pond गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील मालगुजारी तलावांचे कोहळी समाज मालगुजारी तलाव असे नामांतर करण्यात यावे, तसेच ज्या कोहळी समाजाच्या व्यक्तींनी मालगुजारी तलाव बांधण्यात योगदान दिले, अशा व्यक्तींचे नाव व माहिती कोरीव दगडावर लावण्यात यावी, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस चामेश्वर गहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात कोहळी समाजाने सन १३०० ते १५०० या कालखंडात ३६०० च्या वर तलावांची निर्मिती केली आहे. हे सर्व तलाव या समाजाने दस्ताऐवजाच्या आधारानुसार स्वखर्चातून व मेहनतीतून तयार केले आहे.

महत्वाची बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध हा तलाव सन १३०० ते १४०० मध्ये तयार करण्यात आला. त्या काळात हा तलाव तयार करण्याकरिता किंवा बांधण्याकरिता ६४ हजार रुपये खर्च आला असल्याची नोंद सुद्धा आहे. कोहळी या अल्पसंख्यांक मूळनिवासी आदिवासी समाजांने पहिल्यांदा तलाव कोठे तयार करता येईल, त्यात पाणी किती राहील, तलावाची पाळ खूप लांब होणार नाही आदींची पडताळणी केली. त्याचप्रमाणे तलाव परिसरात गाव वसवून गावशिवारात पाणी कसे नेता येईल, काही कारणास्तव तलाव फुटल्यास तलावातील पाणी गावात शिरणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. परिणामी तलावातील पाणी लाभ क्षेत्रातील शेतजमिनीतील पिकांना पाणी होत असते. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून विहिरींना सदैव पाणी राहावे म्हणून गावाच्या सभोवताल पाणी आणण्यात येईल अशी व्यवस्था केली आहे. तलावाचे ओवर फ्लोचे पाणी गावात येणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
या सर्व बाबींचा अभ्यास करून गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात तत्कालीन कोहळी समाज बांधवांनी या सर्व जिल्ह्यात ३ हजार ६०० तलाव तयार केले. ते तलाव आजघडीला अस्तित्वात आहेत. हे सर्व तलाव देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाने आपल्या ताब्यात घेतले. तसेच सर्व तलावांना माजी मालगुजारी तलाव म्हणून नाव देण्यात आले. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर या सर्व जिल्ह्यातील तलावांना माजी मालगुजारी तलाव या नावाऐवजी कोहळी समाज माजी मालगुजरी तलाव हे नाव देऊन तो तलाव ज्या व्यक्तीने स्वतः पैसा खर्च करून स्वतःच्या जमिनीवर तयार केला आहे, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती व परिचय त्या ठिकाणी कोरीव दगडावरती करून त्या ठिकाणी दगड लावण्यात यावा, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस चामेश्वर गहाणे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.