परतीच्या पावसाने १.१० लाख शेतकरी बाधित

14 Nov 2025 18:09:48
गोंदिया,
Loss of paddy crop परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातल्याने हातातोंंडाशी आलेल्या धान पिकाची माती झाली. महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे केले. जिल्ह्यातील ९०० गावांतील १ लाख १० हजार शेतकरी बाधित झाले असून ३९ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सुत्राने दिली. अंतिम अहवाल तयार करून शासनाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाळ्याची सुरवात जरा रडखडतच झाली. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी तर जुलैमध्ये सरासरीपेक्ष अधिक पाऊस बरसला. जुलै व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पिकांची हाणी केली. यातून शेतकरी सावरत असताना ऑक्टोरच्या शेवटी परतीचा पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून होता. धान पीक हाती येण्याच्या स्थितीत असताना २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान बरसलेल्या वादळी पावसाने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
 
 
Loss of paddy crop
 
 
बहुतांश शेतकर्‍यांनी कमी कालावधीच्या धानाची कापणी केली होती. पावसाने धानाचे कडपे भिजल्याने धान शेतातच अंकूरले, कुजले. पुंजण्यात पाणी शिरल्याने पाखड झाले. उभे पीक भूईसपाट झाले. या पावसाने धान उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावल्याने शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. सर्वच स्तरावरून नुकसान भरपाईची मागणी झाल्यानंतर शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यातील ९०० गावांतील ३९ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर १ लाख १० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. अंतिम अहवाल लवकरच शासनाकडे पाठवून नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली जाणार आहे.
 
 
तालुकानिहाय बाधित शेतकरी, गावे व क्षेत्र
तालुका गावे शेतकरी क्षेत्र
  • गोंदिया १४४ ५६७१८ १७१२५
  • गोरेगाव ९९ ८००३ ३१३९
  • तिरोडा १२४ ९१४५ ७४४७
  • अर्जुनी मोर. १३२ १२६२ ६१५.३१
  • देवरी १३५ ५५८२ २६१७.४४
  • आमगाव ८३ १७५८१ ७२१६.०४
  • सालेकसा ८६ ९०५२ ६९३
  • सडक अर्जुनी ९७ १८६९ ११०
Powered By Sangraha 9.0