गांजा तस्करीत तिघांना अटक, एक पसार

14 Nov 2025 21:20:07
वर्धा, 
marijuana-smuggling : सेवाग्राम ते नांदोरा शिवारात गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळताच धडक कारवाई करीत तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. पोलिसांची चाहूल लागताच यातील एक जण पसार झाला. ही कारवाई १३ रोजी नांदोरा शिवारात करण्यात आली. संघर्ष लोखंडे रा. मदनी, रवींद्र मेश्राम रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट आणि सुशील उर्फ जब्बा इंदूरकर रा. रामनगर वार्ड हिंगणघाट अशी अटकेतील नावे असून शुद्धोधन उर्फ सिद्धू माटे रा. कारला वर्धा हा पसार झाला.
 
 
sdkcfj
 
जिल्ह्यात दारूसह गांजाची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी पोलिस पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेला अशा कारवाईसाठी आदेश दिले आहे. याच दरम्यान, गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाला नांदोरा शिवारातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे सेवाग्राम ते नांदोरा मार्गावर सापळा रचला. यावेळी संशयित वाहन दिसताच वाहनांना थांबविण्यात आले. वाहनांची झडती घेतली असता गांजा आढळून आला. यावेळी पथकाने एम. एच. ३४ के. ३८०५ क्रमांकाची कार, एम. एच. ३२ ए. टी. ३४९४ क्रमांकाची दुचाकी, तीन मोबाइल असा ३ लाख ७४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांना अटक करण्यात आली. तर शुद्धोधन माटे हा पसार झाला. या सर्व जणांवर सेवाग्राम पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक, अखिल इंगळे, अक्षय राऊत आदींनी केली.
Powered By Sangraha 9.0