नागपूर,
childrens-day : महिला कला निकेतन संचलित अंकुर प्री-स्कूल येथे शुक्रवारी बालकदिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित टॅलेंट शो मध्ये छोट्यागोट्यांनी फुलवलेली सर्जनशीलता आणि प्रतिभा पाहून सर्वजण भावूक झाले. शिशुगटातील विद्यार्थ्यांनी चेरी, आंबा, अननस, सफरचंद, केळी, पालक, गाजर, टोमॅटो अशा फळे–भाज्यांच्या आकर्षक वेशभूषेत केलेल्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली. त्यांच्या निरागस हावभावांनी आणि उत्साही उपस्थितीने प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी केजी–१ आणि केजी–२ च्या विद्यार्थ्यांनी झाशीची राणी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, वीर सावरकर, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले आणि चाचा नेहरू यांच्या रूपात अवतार धारण करून भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांना हृदयस्पर्शी आदरांजली वाहिली. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे परीक्षण व्यवस्थापन सदस्या सुनिता अनगल यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक, प्रेरणादायी अभिप्राय देत त्यांनी त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्या स्वाती पटवर्धन यांनी मुलांच्या सादरीकरणाची आणि शिक्षक–पालकांच्या परिश्रमांची विशेष प्रशंसा केली. "शिक्षकांनी केलेले प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहेत," असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला पौष्टिक चिक्की देण्यात आली आणि बालकदिनाचा उत्सव गोड आठवणींनी साजरा झाला.