नवी दिल्ली,
Pressure on Al Falah University दिल्लीतील स्फोटानंतर फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठातील डॉक्टरांचा सहभाग समोर आल्यावर तपास यंत्रणांनी या विद्यापीठाभोवती चौकशीचा फास अधिक घट्ट केला आहे. विद्यापीठांचे मानांकन ठरवणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच वैद्यकीय नियामक प्राधिकरणानेहीअल फलाह विद्यापीठावरील कारवाईस सुरुवात केली आहे. तसेच, विद्यापीठाचे आर्थिक स्त्रोत आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर प्राथमिक चौकशीत पोलिसांनी अल फलाह विद्यापीठात कार्यरत तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये डॉ. मुझम्मील, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन यांचा समावेश होता. हे तिघेही विद्यापीठाशी संबंधित प्राध्यापक आहेत. या घटनेनंतर विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी आज फरिदाबादमधील धौज येथे विद्यापीठाच्या आवारातून मारुती सुझुकी ब्रेझा जप्त केली, जी गाडी आरोपी डॉ. शाहीन शाहिदच्या नावावर नोंदणीकृत होती.
अल फलाह विद्यापीठाच्या काही महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (नॅक) मान्यता दिली असल्याचा विद्यापीठाच्या वेबसाइटवरील दावा खोटा असल्याचे नॅकने स्पष्ट केले आहे. नॅकच्या नोटीशीत म्हटले आहे की या विद्यापीठाला नॅककडून मान्यता मिळालेली नाही, तसेच विद्यापीठाने मान्यता मिळवण्यासाठी अर्जही केला नाही. तरीही विद्यापीठाने वेबसाइटवर सार्वजनिकरीत्या काही महाविद्यालये नॅकद्वारे प्रमाणित असल्याचा उल्लेख केला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे.
अल फलाह विद्यापीठ हे अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम असून त्याच्या अधिकृत वेबसाइटवर अल फलाह स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (१९९७ पासून, नॅकद्वारे ए श्रेणी), ब्राऊन हिल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (२००८ पासून) आणि अल फलाह स्कूल ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग (२००६ पासून, नॅकद्वारे ए श्रेणी) या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. हा दावा नॅकच्या नोटीशीनुसार चुकीचा आहे. यानंतर अल फलाह विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट देखील बंद पडली आहे. या प्रकरणामुळे दहशतवादी कारवायांसाठी झालेल्या आर्थिक पुरवठ्यात अल फलाह विद्यापीठाचा सहभाग होता का, हे तपासण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाशी संबंधित डॉक्टरांचे आर्थिक व्यवहार ईडी आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत तपासले जातील, असे संकेत मिळत आहेत.