नागपूर,
ramesh-harde : तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात मुले मोबाईलच्या वापरात रमली असून वाचनापासून दूर जात आहेत. अशा परिस्थितीत “चौकटीतील नव्हे, तर चौफेर शिक्षणाची गरज आहे”, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश हरडे यांनी केले. सेवासदन शिक्षण संस्थेच्या बालक मंदिर, प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या त्रिदिवसीय संयुक्त स्नेहसंमेलनाचे बुधवारी शाळेच्या प्रांगणात भव्य उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वंदना लखानी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी तर सचिव वासंती भागवत, सहसचिव डॉ. कल्पना तिवारी, साधना हिंगवे आणि सदस्या मनीषा यमसनवार उपस्थित होते. बोलताना रमेश हरडे म्हणाले, “मराठी शाळांची अवस्था दयनीय होत असताना सेवासदन ही सर्वाधिक पटसंख्या असलेली आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा वाचनाकडे वळवावे लागेल. शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीऐवजी फॅसिलिटेटर म्हणून स्मार्ट शिक्षणपद्धती स्वीकारली पाहिजे. नवनवीन तंत्राच्या आकर्षणाने मुले दिशाभूल होत आहेत; त्यापासून त्यांना दूर करणे गरजेचे आहे.” कार्यक्रमात प्राथमिक शाखेच्या मुख्याध्यापिका हर्षा उकेश यांनी प्रास्ताविक केले, तर संदीप झाडे यांनी अहवालवाचन केले. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संस्थापक स्व. रमाबाई रानडे यांच्या कार्यावर सुंदर नाटिका सादर केली.
- दर्जेदार शिक्षणाचे माहेर : वंदना लखानी
“शंभर वर्षे सातत्याने राष्ट्रीय व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही मोठी कामगिरी आहे. सेवासदनची ही परंपरा उल्लेखनीय आहे. आगामी काळात संस्था आणि विद्यार्थी आणखी मोठी उंची गाठतील,” असे मत उद्घाटक वंदना लखानी यांनी व्यक्त केले.