नागपूर,
Research Methods Workshop : उच्च शिक्षण व संशोधन केंद्र तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या पदव्युत्तर अध्यापन विभाग आणि संताजी महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संशोधन पद्धतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. संशोधन पद्धती कार्यशाळा नुकताच संताजी महाविद्यालयात पार पडली. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, संताजी शिक्षण विकास संस्था नागपूरचे अध्यक्ष दिनेश वंजारी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे आयोजक विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय पळवेकर आणि संताजी महाविद्यालय नागपूरच्या प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी मंचावर उपस्थित होत्या.

स्वागतपर भाषणात प्राचार्या डॉ. प्रिया वंजारी यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. डॉ. संजय पळवेकर यांनी संशोधनाचे व्यावहारिक महत्त्व अधोरेखित करत त्यातून समाज, राष्ट्र व मानवजातीला मिळणाऱ्या व्यापक लाभांविषयी सहभागींचे मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भाषा संशोधनातील सूक्ष्मता, त्याचे महत्त्व व समाजाला मिळणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. श्री दिनेशजी वंजारी यांनी भारताला अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, चीन व जपानसारख्या देशांप्रमाणे जागतिक महासत्ता बनविण्यासाठी संशोधनाची गरज अधोरेखित करत सहभागींना प्रोत्साहन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. माधवी खोडे चवरे यांनी संशोधन विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाकडे मनापासून व गांभीर्याने पाहण्याची गरज आणि संशोधनातील नावीन्यतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यशाळेतील विविध सत्रांत मान्यवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. संजय पळवेकर यांनी 'संशोधनातील आवश्यक गोष्टी' या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. प्रांतिक बॅनर्जी यांनी एआयच्या काळातील सिद्धांत : परत बार्थेस कडे' या विषयावर विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ. प्रिया वंजारी यांनी ‘संशोधनासाठी सैद्धांतिक दृष्टिकोन' या विषयावर सत्र घेतले. गुजरात येथील महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. दिलीप बारड यांनी 'संशोधनासाठी डिजिटल साधने' या विषयावर ऑनलाइन सत्र घेतले. विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहिती विज्ञान विभाग प्रमुख तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मंगला हिरवाडे यांनी 'संशोधनाचे मॅट्रिक्स' या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ. नीहाल शेख यांनी पीएचडी प्रबंध सादरीकरणासाठी आवश्यक कागदपत्रांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.