आठवड्यात शरद पवारांना दुसरा झटका! मित्र पक्षाचा दगा

14 Nov 2025 15:25:37
मुंबई,
Sharad Pawar : आठवड्याभरात शरद पवार यांना दुसऱ्या मोठ्या झटक्याचा सामना करावा लागत आहे. आधी भाजपकडून झटका बसला, आता महाविकास आघाडीतील पक्षानेच शरद पवार यांना धक्का दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने राजकीय हालचाली जोर धरत आहेत. येत्या 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, त्याआधी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरु झाले आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील अनेक नेते, पदाधिकारी आता सत्ताधारी महायुतीत प्रवेश करत आहेत.
 
 
sharad pavar
 
 
 
धाराशिवमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक जगदाळे यांनी दोन वेळा तुळजापूर विधानसभा लढवल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धारही त्यांनी स्पष्ट केला आहे.
 
 
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अशोक जगदाळे यांनी जाहीर केले की, नळदुर्ग नगरपालिका निवडणूक भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणूनच लढवली जाईल. याबाबत फॉर्म्युला ठरला आहे; काँग्रेस नगराध्यक्ष पदासह 18 जागा मिळवणार आहे, तर शिवसेना उबाठा आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 जागा मिळेल.
 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही मोठी खेळी असून, भाजपने आधीच शरद पवार गटाला सोलापुरात धक्का दिला होता. सोलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. या गटात दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांचा मुलगा प्रथमेश कोठे यांचा समावेश आहे.
 
 
भाजपने शरद पवार गटाचे पाच माजी नगरसेवक फोडले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा आणि माजी नगरसेवक शशिकांत कैंची यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
 
या हालचालींनी स्थानिक राजकारणात मोठा गदारोळ माजवला असून, आगामी निवडणुकीच्या आधी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
Powered By Sangraha 9.0