नवी दिल्ली,
Varun Chakravarthy to captain ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत प्रभावी फिरकी माऱ्या घडवून आणल्यानंतर भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 साठी तामिळनाडू संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. येत्या 26 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत तामिळनाडूचा पहिला सामना राजस्थानशी होणार आहे. नारायण जगदीसन यांची उपकर्णधार म्हणून निवड झाली असून, चक्रवर्तीचा हा कोणत्याही स्तरावरील पहिलाच कर्णधारपदाचा कार्यकाळ असणार आहे. त्यांनी या पदावर एम. शाहरुख खानची जागा घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत तीन डावांत 5 बळी घेऊन चक्रवर्तीने आपल्या लयबद्ध कामगिरीची चमक दाखवली होती. भारतासाठी त्यांनी आतापर्यंत 4 एकदिवसीय सामन्यांत 10 बळी घेतले असून 29 टी-20 सामन्यांत त्यांची बळी संख्या 45 वर पोहोचली आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्यांनी 27 सामन्यांमधून 69 बळी घेतले आहेत, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या एकमेव सामन्यात त्यांनी एक विकेट घेतली आहे.
यंदाच्या तामिळनाडू संघात डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन, गुर्जपनीत सिंग, आर. सिलंबरसन, आर. साई किशोर आणि एम. सिद्धार्थ यांच्यासारखे अनुभवी खेळाडू सामील आहेत. आगामी स्पर्धेत तामिळनाडू संघ एलिट ग्रुप डी मध्ये असून या गटात दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, कर्नाटक, त्रिपुरा, सौराष्ट्र आणि झारखंड यांचा समावेश आहे. सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात तामिळनाडूची कामगिरी सरासरी राहिली आहे. चार सामन्यांमध्ये संघाला दोन पराभव आणि दोन बरोबरी मिळाली असून ते गटात सहाव्या स्थानावर आहेत. झारखंडविरुद्ध डाव आणि 114 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर संघाने नागालँड व विदर्भाविरुद्ध बरोबरी साधली, तर आंध्र प्रदेशविरुद्ध चार विकेटने पराभव पत्करावा लागला.
तामिळनाडूचा संघ:
वरुण चक्रवर्ती (कर्णधार), नारायण जगदीसन (उपकर्णधार/यष्टीरक्षक), तुषार रहेजा (यष्टीरक्षक), व्हीपी अमित सात्विक, एम. शाहरुख खान, आंद्रे सिद्धार्थ, प्रदोष रंजन पॉल, शिवम सिंग, आर. साई किशोर, एम. सिद्धार्थ, टी. नटराजन, ए. गुरजा, आर. यादव, आर. सिलंबरासन आणि एस. रितिक इसवरन.