एैन निवडणुकीच्या तोंडावर वर्धा नपची इंटरनेट सेवा ठप्प

14 Nov 2025 21:13:18
वर्धा, 
wardha-municipal-council : नगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग येत असतानाच शहरातील करदात्यांसह इच्छूक उमेदवार्‍यांची अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे मोठी अडचण निर्माण झाली. शुक्रवार १४ रोजी वर्धा नगरपालिकेची इंटरनेट सेवा सकाळपासून पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांसह आणि उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागला.
 
 
np
 
निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांना उमेदवारी अर्जासोबत कर भरल्याचा दाखला सादर करावा लागतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कर विभागात मोठी गर्दी दिसत होती. अनेकांनी शुक्रवारचा दिवस निवडून कर भरण्यासाठी नगरपालिका गाठली. मात्र, इंटरनेट सेवा बंद असल्याने महसूल पावत्या तयार करणे, कर रकमांची नोंदणी करणे आणि दाखले देणे या सर्व प्रक्रियांवर परिणाम झाला. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने कामकाज काही तास ठप्प पडले होते. त्यातच कर विभागातील प्रिंटरही अचानक नादुरुस्त झाले. त्यामुळे काही वेळ संपूर्ण कामकाज थांबले. कराची पावती निघू शकत नसल्याने काही जणांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. कर भरण्यासाठी आलेल्यांनी नाराजी व्यत केली.
 
 
या तांत्रिक बिघाडामुळे अनेकांच्या दैनंदिन कामांत अडथळे आले. दिवसभराची सुटी काढून नगरपालिका गाठणारे नागरिक रांगेत उभे होते. काहींचे काम न झाल्याने परत जावे लागले. दुसरीकडे, इंटरनेट सेवा आणि प्रिंटरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला बराच वेळ लागला. नगरपालिका अधिकार्‍यांनी इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याचे आणि प्रिंटर दुरुस्त करण्याचे प्रयत्न तत्काळ सुरू केले असल्याचे सांगितले. मात्र, कर विभागातील कामकाज वारंवार तांत्रिक कारणांमुळे ठप्प पडत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जाते.
 
 
नगरपालिकेची इंटरनेट सेवा सकाळपासून बंद पडली. त्यात कर विभागातील पिंटरही नादुरुस्त झाले. त्यामुळे काही वेळ संपूर्ण कामकाज थांबले. कराची पावती निघू शकत नसल्याने तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत रांगेत उभे असलेले करदाते प्रफुल्ल पारधी, प्रभा पेटकर आणि अमित जैन यांनी व्यत केली.
Powered By Sangraha 9.0