छ.संभाजीनगर,
BJP Vice President dies छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. या घटनेमुळे संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय गणेश टेमकर यांचा मृत्यू अचानक झाला असून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी मृतदेह आढळल्यानंतर तात्काळ गंगापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, विजय पाखरे आणि अनिरुद्ध शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, मृतदेहावर कोणत्याही मारहाण किंवा शस्त्रहल्ल्याचे ठसे आढळलेले नाहीत. तसेच, वाहनाने धडक दिल्याचेही कोणतेही स्पष्ट चिन्हे आढळलेले नाहीत. त्यामुळे हा मृत्यू अपघात आहे की घातपात, यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. गणेश टेमकर हे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्या अचानक मृत्यूनंतर भाजपाच्या स्थानिक वर्तुळात धक्का बसला असून कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते भालगाव येथील रहिवासी होते आणि त्यांच्या मृत्यूने स्थानिक पातळीवर मोठा गोंधळ निर्माण केला आहे.