वर्धा,
bus-driver-brutally-beaten-up : वडकी येथून हिंगणघाटकडे निघालेली बस स्थानकावर आली असता प्रवेशद्वारावर दोन इसम बोलत होते. चालकाने हॉर्न वाजवून दोघांना बाजूला होण्याचे संकेत दिले. दोन्ही इसम बाजूला झाले तेव्हा वाहकाने त्या दोघांकडे बघितले असता इसमांनी अश्लिल शिवीगाळ केली. तसेच चालकाने बस थांबविताच दोघांनी बस वाहकास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. ही घटना १३ रोजी हिंगणघाट बसस्थानकावर घडली. याप्रकरणी तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला.
शंकर गजभीये (४७) असे बस वाहकाचे तर निखील काटकर आणि अनुप काटकर रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट असे मारहाण करणार्यांची नावे आहेत. वाहक शंकर गजभीये आणि चालक नितीन बेले हे एम. एच. ४० एल. ४६८० क्रमांकाच्या बसने हिंगणघाट ते वडकी बस घेऊन गेले. वडकी येथील प्रवासी उतरवून ते सायंकाळी ५.२० वाजता हिंगणघाटच्या दिशेने निघाले. ६.४५ वाजता बस हिंगणघाट स्थानकावर आली. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच निखिल आणि अनुप काटकर हे दोघे उभे असल्याने चालकाने हॉर्न वाजवून त्यांना बाजूला होण्याचे संकेत दिले. निखील आणि अनुप दोघेही वाहकाच्या दिशेने बाजूला झाले. त्यावेळी शंकर गजभीये यांनी त्यांच्याकडे बघितले असता निखील आणि अनुपने अश्लिल शिवीगाळ केली. तसेच बस थांबताच गजभीये यांना बेदम मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. त्यावेळी शंकर गजभीये आणि नितीन बेले यांनी हिंगणघाट पोलिस ठाणे गाठून दोघांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.