नवी दिल्ली,
Delhi 200 doctors on radar दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या तपासाला गती मिळत असताना सुरक्षा यंत्रणांनी मोठी हालचाल सुरू केली असून सुमारे २०० डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची सविस्तर चौकशी करण्याची तयारी करण्यात आली आहे. या सर्वांची माहिती एकत्र करून स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून, त्यांचा एक-एक करून तपास घेण्याचे ठरवले गेले आहे. प्राथमिक तपासातून असे संकेत मिळाले आहेत की या घटनेचे धागेदोरे दिल्लीपुरते मर्यादित नसून काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा तसेच काही परदेशी गटांशीही जोडलेले असू शकतात.

या यादीतील डॉक्टरांचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन, डॉ. उमर मोहम्मद आणि इतर संशयितांशी होता का याचा तपास सुरू आहे. डॉ. शाहीनवर ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूल उभारल्याचा संशय असून, तिने तयार केलेल्या नेटवर्कमध्ये कोण कोण सामील होते याचा बारकाईने शोध घेतला जात आहे. उत्तर प्रदेश एटीएसने तिच्या संपर्कात असलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींचा माग घेतला असून, धर्मांतर नेटवर्कशी संबंधित काही धागेदोरे देखील तपासात समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात काम करणारे आणि काश्मिरी वंशाचे असलेले जवळपास २०० डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी सुरक्षा एजन्सींच्या रडारवर आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डॉ. शाहीन सतत ३० ते ४० डॉक्टरांच्या संपर्कात होती. तिचे संपर्क जाळे केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानसह परदेशातील डॉक्टर विशेषतः पाकिस्तानी लष्कराशी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पसरले असल्याचे समोर आले आहे. ती जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील महिला विंगसाठी भरती करण्याचे काम करत असल्याचा संशयही तपासात नोंदवला गेला आहे.
तपासाचा वेग वाढवण्यासाठी एटीएसची एक टीम दिल्लीत तैनात असून आणखी एक टीम श्रीनगरला रवाना होण्याची तयारी करत आहे. त्यामुळे काही आणखी संशयितांना लवकरच ताब्यात घेतले जाऊ शकते. याच दरम्यान, गुरुवारी मेवात परिसरातून तिघा डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली आहे. हे तिन्ही डॉक्टर अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित असून त्यापैकी डॉ. मुस्तकीम यांनी येथेच इंटर्नशिप पूर्ण केली होती. त्यांच्या भूमिकेबाबत चौकशी सुरू आहे. तसेच, आरोपी उमर आणि शाहीनच्या संपर्कात असलेल्या मुझम्मिलचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून सुरक्षा यंत्रणांसमोर आता या संपूर्ण नेटवर्कचा अचूक माग काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.