मुंबई,
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंधत्व मुक्त महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत आरोग्यविषयक उपक्रमांना मोठा हातभार लागला आहे. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून तब्बल ₹९९३.९७ लाख (सुमारे १० कोटी रुपये) किमतीचे प्रकल्प मंजूर झाले आहेत, जे आरोग्यसेवा, जनजागृती आणि गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्य वाढविण्यावर केंद्रित आहेत.
नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात डोळ्यांचे शिबिरे आणि ५,००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी २५०.५४ लाख रुपये खर्च होणार आहेत. ग्रामीण आणि दुर्बल घटकांतील नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नागपूर व अमरावती विभागातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये १० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिरे राबवण्यासाठी ३६४.८५ लाखांचे अनुदान दिले गेले आहे, ज्यामुळे विदर्भातील ग्रामीण भागात नेत्र आरोग्य सेवा बळकट होईल.
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे खरेदी करून रुग्णसेवा अधिक प्रभावी बनवण्यासाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रविज्ञान, रेडिओलॉजी आणि भूलतज्ज्ञ विभागासाठी ३२८.५८ लाख रुपये मंजूर केले गेले आहेत.
याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने कोळसा क्षेत्रातील कंपन्यांमार्फत मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF) तसेच राज्यातील विविध रुग्णालयांशी CSR सहकार्य स्थापून गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत पुरविण्याचे प्रस्ताव राबविण्यात येणार आहेत.
या सर्व प्रकल्पांमुळे विदर्भातील आरोग्यसेवा सुधारली जात असून मोफत नेत्रशिबिरे व शस्त्रक्रियांमुळे हजारो रुग्णांना दृष्टिदान मिळत आहे. आधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे नागपूरमधील सार्वजनिक रुग्णालयांची सेवा गुणवत्ता वाढली असून CSR निधीचा प्रभावी उपयोग आरोग्य क्षेत्रातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व आणि लोककल्याण यांचे संगम साधत महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देत आहेत.