ठाणे,
Handsome Reelstar Scandal : मॉडेलिंग क्षेत्रात लाखो चाहते असलेला आणि सोशल मीडियावर ‘हँडसम रील स्टार’ म्हणून ओळखला जाणारा शैलेश रामगुडे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. विष्णूनगर पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली अटक केली असून, त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असलेल्या अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांची लूट केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारा शैलेश रामगुडे हा इन्स्टाग्रामवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला लोकप्रिय चेहरा. त्याचा देखणा लूक आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरमुळे अनेक तरुणी त्याच्याकडे आकृष्ट व्हायच्या. तो इन्स्टाग्रामवरून तरुणींशी ओळख वाढवत असे, त्यांच्याशी मैत्री करत असे, आणि त्यानंतर प्रेमाचे नाटक करून त्यांचा ठाम विश्वास संपादन करीत असे. नंतर लग्नाचे आश्वासन, भावनिक आमिषे दाखवत तो त्या मुलींना आर्थिक मदत किंवा सोन्याचे दागिने मागायचा. विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत त्याने अनेक तरुणींना मोठ्या रकमेचा गंडा घातल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
डोंबिवलीतील एका उच्चशिक्षित तरुणीने पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर रामगुडेचा हा संपूर्ण फसवणुकीचा डाव उघडकीस आला. तक्रारदार तरुणीने त्याला सव्वा किलो सोन्याचे दागिने आणि तब्बल 51 लाख रुपये दिल्याचे नमूद केले होते. या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 37 तोळे सोने, एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन असा अंदाजे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, शैलेश रामगुडे याच्यावर यापूर्वीही कापूरबावडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही प्रकरणांतही दोन वेगळ्या तरुणींनी त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. एका प्रकरणात 43 लाख तर दुसऱ्यात 29 लाख रुपये असा मोठा घोटाळा त्याने केला असल्याचे समोर आले आहे.
सध्या रामगुडे विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांना असे वाटते की त्याने आणखीही काही तरुणींना फसवले असावे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, सोशल मीडियावर कोणाशीही मैत्री करण्याआधी अत्यंत सावधगिरी बाळगावी, भावनिक गोष्टींना सहज बळी पडू नये आणि आर्थिक व्यवहारांपासून दूर राहावे, असा महत्त्वपूर्ण संदेशही पोलिसांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडिया ‘ग्लॅमर’च्या पडद्यामागील काळी दुनिया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली असून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवताना किती जागरूक राहणे गरजेचे आहे, याची तीव्र जाणीव निर्माण झाली आहे.