मालेगाव,
nagar panchayat elections मालेगाव नगर पंचायत निवडणुकीची तयारी तपासण्यासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे, अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी १४ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत स्तरावरील सर्व निवडणूक सुविधांची व्यापक पाहणी करून संपूर्ण प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला.
निरीक्षणादरम्यान खंडागळे यांनी सर्वप्रथम मालेगाव शहरातील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. केंद्रांवरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रकाश योजना, रॅम्प आदी दिव्यांग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेली तयारी याबाबत त्यांनी तपशीलवार मागोवा घेतला. मतदान केंद्रांवरील सर्व यंत्रणा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यरत आहेत याची त्यांनी खात्री केली. यानंतर तहसील कार्यालय, मालेगाव येथे त्यांनी ईव्हीएम सुरक्षा कक्षाची पाहणी केली. ईव्हीएम मशीनचे साठवण, सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेर्यांची कार्यक्षमता, प्रवेश नियंत्रण तसेच तैनात पोलिस बंदोबस्त याबाबत त्यांनी माहिती घेतली. ईव्हीएम हाताळणी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानंतर तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी, मतदान कर्मचार्यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा नियोजन तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन याबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा करण्यात आली.nagar panchayat elections यावेळी खंडागळे यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक निरीक्षकांनी प्रशासनाने केलेल्या एकूण तयारीबद्दल समाधान व्यक्त केले असून, उर्वरित कामे वेळेत आणि निकषांनुसार पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने घेतलेली ही तयारी उत्साहवर्धक असल्याचे निरीक्षकांनी नमूद केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पुंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पंकज सोनोने, अरविंद करंगळे,एसएसटी पथकाचे नोडल अधिकारी जोगदंड व इतर यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.