नागपूर,
Juvenile Reformatory News गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पाटणकर चौकातील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. दोघांनी सुरक्षारक्षकांना गुंगारा देऊन पळ काढला होता. दीड वर्षांपूर्वी पळून गेलेल्या दोघापैकी एका मुलाचा (विधीसंघर्षग्रस्त बालक) शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने परेशन शोध 2 अंतर्गत ही कामगिरी बजावली, कृष्णा श्यामराव हिवराळे (वय 58, रा. कोराडी) यांनी कपिलनगर येथे तक्रार दिली होती की, 5 मे 2024 च्या पहाटे 3.30 च्या सुमारास पाटणकर चौक येथील बालसुधारगृहातील 2 अल्पवयीन मुले पळून गेले होते. त्यांचा बराच शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाही तसेच ते सुधारगृहात परत आले नाही. कपिलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑपरेशन शोध 2अंतर्गत गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाच्या प्रमुख ललिता तोडासे यांच्या नेतृत्वातील पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. 13 नोव्हेंबर 2025 रोजी या दोन मुलांपैकी एक अल्पवयीन मुलगा छत्तीसगढच्या खैरागड तालुक्याच्या धनेरी या गावी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या गावी जाऊन मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची सविस्तर विचारपूस केली. त्याचे समुपदेशन केले. त्याला पुढील कारवाईसाठी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस निरीक्षक ललीता तोडासे, पोलीस अंमलदार ऋषीकेश डुमरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.