11 कोटी कुटुंबांसाठी खुशखबर! 19 नोव्हेंबरला मिळणार आर्थिक मदत

15 Nov 2025 12:23:22
नवी दिल्ली,
Kisan Samman Nidhi Yojana बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता येत्या १९ नोव्हेंबरला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, यामुळे ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना थेट फायदा मिळणार आहे. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला ६,000 रुपयांची मदत देते. आतापर्यंतच्या २० हप्त्यांमधून ३.७० लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. ही मदत बी-बियाणे, शेतीसाठी लागणारा खर्च, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध गरजांसाठी उपयुक्त ठरते.
 

Kisan Samman Nidhi Yojana 
 
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांची सतत पडताळणी सुरू असून अपात्र किंवा बोगस नावे यादीतून वगळली जात आहेत. त्यामुळे खरी आणि पात्र शेतकरी कुटुंबांपर्यंतच निधी पोहोचेल, याची खात्री सरकार घेत आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या तीन राज्यांमधील प्रभावित शेतकऱ्यांच्या खात्यात ५४० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम विशेष मदत म्हणून जमा करण्यात आली.
 
 
दरम्यान, २१ वा हप्ता मिळणार आहे की नाही, हे शेतकरी स्वतःही घरबसल्या तपासू शकतात. यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी कॉर्नर’मधील ‘लाभार्थी यादी’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक नोंदवल्यावर पेमेंटची स्थिती दिसून येते. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीनंतर ही मोठी आर्थिक दिलासा देणारी भेट मिळणार असून १९ नोव्हेंबरची तारीख शेतकरी वर्गासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0