नांदगाव पेठ,
love-jihad-case : देशभरात लव्ह जिहादच्या घटनांची संख्या वाढत असताना नांदगाव पेठ परिसरातही अशाच धक्कादायक प्रकाराने ग्रामस्थांना हादरवून सोडले आहे. स्थानिक विवाहित महिलेला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस येताच गावकर्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित महिलेच्या पतीने ७ नोव्हेंबर रोजी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती; मात्र अद्यापही आरोपी मोकाट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नांदगाव पेठ येथील एका विवाहित महिलेला आरोपी युवकाने प्रेमाच्या आणि फुस लावण्याच्या आमिषाने पळवून नेल्याचा आरोप तिच्या पतीने पोलिस ठाण्यात केला आहे. महिलेचा पाच वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी असून अचानक आईपासून दुरावल्यानंतर कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. पीडित कुटुंबाने तक्रार नोंदवल्यानंतरही पोलिसांनी केवळ औपचारिक चौकशी करून आरोपीला मोकळे सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. आरोपी सध्या मोकाट असून, महिलेला कुठे नेले, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या निष्क्रियतेमुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजप कार्यकर्ते मोरेश्वर इंगळे यांच्या नेतृत्वात गावकरी पोलिस स्टेशनवर धडकले. यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही पोलिस स्टेशनला भेट देऊन ग्रामस्थांची बाजू समजून घेतली. आरोपीला त्वरित अटक करून पीडित महिलेला सुरक्षितरीत्या कुटुंबाच्या स्वाधीन करावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. या घटनेमुळे नांदगाव पेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लव्ह जिहादच्या संशयित घटनांबद्दल प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी माजी सरपंच दिगंबर आमले, संजय इंगळे, अरुण राऊत, संजय चौधरी, किशोर राऊत तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते.
पोलिस खाली हात परतले
दरम्यान, संबंधित महिलेला दर्यापूर तालुक्यातील उपराई येथे नेल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी तातडीने उपराई येथे पोलिस पथक पाठवले; मात्र पोलिसांना काहीच हाती लागले नाही. पोलिस तेथून रित्या हाताने परतले. याप्रकरणी महिलेचा तसेच आरोपीचा कसोशीने शोध सुरू असल्याचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी सांगितले.