मारुतीने वापस मागविल्या तब्बल ३९,००० गाड्या!

15 Nov 2025 14:42:49
नवी दिल्ली,
Maruti recalls cars देशातील अग्रगण्य वाहन निर्माता मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय ग्रँड विटारा एसयूव्हीच्या ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत तयार झालेल्या मॉडेल्समध्ये इंधन पातळी दाखवणाऱ्या प्रणालीत तांत्रिक बिघाड आढळला आहे. स्पीडोमीटरमध्ये असलेले फ्यूल लेव्हल इंडिकेटर आणि वॉर्निंग लाइट कधी कधी चुकीची माहिती दाखवत असल्यामुळे वाहनधारकांना टँकमधील वास्तविक इंधन किती आहे हे स्पष्टपणे कळत नव्हते.
 
Maruti recalls cars
 
या तांत्रिक त्रुटीमुळे ग्रँड विटाराच्या ३९,५०६ युनिट्सचा रिकॉल करण्यात आला आहे. कंपनीने सांगितले की गाडीच्या मालकांशी थेट संपर्क साधला जाईल किंवा त्यांनी जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधावा. तपासणीदरम्यान दोष आढळल्यास दुरुस्ती विनामूल्य करण्यात येईल. ग्राहकांची सुरक्षितता आणि वाहनाची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी ही खबरदारीची पावले उचलल्याचे मारुती सुझुकीने स्पष्ट केले आहे.
 
गेल्या काही वर्षांत भारतीय वाहन कंपन्यांनी स्वैच्छिक रिकॉल प्रक्रियेला गती दिली असून, सुरक्षेला प्राधान्य देत गुणवत्तेबाबत अधिक काटेकोर भूमिका घेतली आहे. ग्रँड विटारासाठी हा रिकॉल त्याच परंपरेचा एक भाग आहे. मारुती सुझुकीने अलीकडेच एसयूव्ही श्रेणीतील आपली उपस्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. टोयोटासोबत संयुक्तपणे विकसित केलेली ग्रँड विटारा ही कंपनीच्या प्रमुख मॉडेल्सपैकी एक मानली जाते. स्ट्राँग-हायब्रिड तंत्रज्ञान, ऑल-व्हील ड्राइव्ह पर्याय आणि आधुनिक वैशिष्ट्ये हे या वाहनाचे मुख्य आकर्षण आहे. जीएसटी सुधारणांनंतर या मॉडेलच्या किमतीत सुमारे १.०७ लाख रुपयांची कपातही करण्यात आली आहे. सध्या ही कार १०.७७ लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरियंटची किंमत १९.७२ लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीच्या दाव्यानुसार पेट्रोल मॉडेल २१.११ किमी प्रतिलिटर तर सीएनजी मॉडेल २६.६ किमी प्रतिकिलोपर्यंतचे मायलेज देते.
Powered By Sangraha 9.0