ओबीसी व सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी नव्याने सोडत

15 Nov 2025 16:46:47
अकोला,
municipal-election-akola महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अलीकडेच प्रमिलाताई ओक हॉल येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. आरक्षण सोडतीचा निकाल निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान, आयोगाने ओबसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात ही सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे.
 
 
 
municipal-election-akola
अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, इतर मागास वर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने एससी, एसटी व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेले आरक्षण यथास्थित ठेवले असले तरी नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग या दोन प्रवर्गांसाठीचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले आहेत. शासनाच्या २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तरतुदीतील नियम ६(३) आणि ६(४) नुसार आरक्षणाची पुनर्नियुक्ती बंधनकारक असल्याने महानगरपालिकेला नवी सोडत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण थेट सोडतीद्वारे निश्चित करण्यासाठी सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0