शिंदे गटाला धक्का! सामूहिक राजीनाम्यांनी खळबळ

15 Nov 2025 16:28:23
मुंबई,
shinde-group-mass-resignations : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा होताच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळ्यांवर उमेदवारी, युती आणि स्थानिक समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. काही ठिकाणी पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत, तर काही ठिकाणी आघाड्यांची सांघिक रणनीती आखली जात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
SHINDE
 
 
 
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण ही नियुक्ती होताच पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून वर आली. दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत एकाचवेळी सामूहिक राजीनामे सादर केले. जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल गट नाराज असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५५ शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामा दिला आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी तफावत शिंदे गटासाठी गंभीर आव्हान मानली जात आहे.
 
 
यापेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या गटाशी संबंधित २० हजार सभासदही पक्षाचा त्याग करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व सभासद स्वतःचे राजीनामे पोस्टाद्वारे पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा निर्णय करमाळ्यात झालेल्या प्रमुख शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या सामूहिक निषेधामुळे करमाळ्यातील शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणावर खिळखिळी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
दिग्विजय बागल यांनी यापूर्वी करमाळा विधानसभा निवडणूक शिंदे गटाकडून लढवली असल्याने, त्यांच्या समर्थकांची संख्या या भागात मोठी आहे. आता त्यांना निवडणुकीत डावलले जात असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून, त्यातूनच सामूहिक राजीनाम्याचे हे नाट्य उफाळून आले आहे.
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत असलेली ही घडामोड शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरणार असून, संघटनातील अंतर्गत मतभेद आगामी निवडणुकांवर परिणाम करू शकतात, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
Powered By Sangraha 9.0