वरोडा,
dr jyeshtharaj joshi शालेय विद्यार्थ्यांमध्ये बाल वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. परदेशी संशोधनापेक्षा भारतात होणारे संशोधन अधिक सरस असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी केले. लोकशिक्षण संस्था वरोडा आणि विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वरोडा येथे आयोजित अकराव्या बाल विज्ञान संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून मंचावर गणितज्ज्ञ डॉ. विवेक पाटकर, कन्सेप्टस अनलिमिटेडच्या संचालिका डॉ. मानसी राजाध्यक्ष, विज्ञान परिषदेचे सचिव डॉ. दिलीप हेर्लेकर, अभय यावलकर, लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी यांची उपस्थिती होती. डॉ. ज्येष्ठराज जोशी यांनी, एकाग्रतेसाठी ध्यानधारणेचे जीवनातील महत्त्व स्पष्ट करताना, आनंदी व्यक्तित्व आणि प्रसन्न वातावरण विधायक कार्याच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. आमटे यांनी, वर्तमानातील वाढत्या विध्वंसक प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त करताना, सृजनशील निर्मितीचा शाश्वत आनंद देण्याची क्षमता विज्ञानामध्ये असल्याचे प्रतिपादन केले. जगात कुष्ठरुग्णाची अवहेलना कशी होते याबद्दलही त्यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. राजाध्यक्ष यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ही आज काळाची गरज झाली आहे, हे विविध उदाहरणे देत दृकश्राव्य पद्धतीने समजावून सांगितले. प्रा. पाटील यांनी, बाल विज्ञान संमेलन हे लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावरील चाहूल असल्याचा अतिशय आनंदी क्षण असल्याची भावना व्यक्त केली.dr jyeshtharaj joshi लोककल्याण हाच विज्ञानाचा स्थायीभाव असला पाहिजे. संपूर्ण मानवी जीवनाला कवेत घेण्याची क्षमता विज्ञानामध्ये आहे. परंतु, या क्षमतेचा उपयोग विध्वंसासाठी न होता विकासासाठी, विवेकासाठी व्हावा, असेही प्रा पाटील म्हणाले. यावेळी राज्यस्तरीय प्रकल्प पुरस्कारप्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी, तर प्रास्ताविक प्राचार्य राहुल राखे यांनी केले. आभार स्मिता बोंडे यांनी मानले.