जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनाची गरज : सुभाष शर्मा

15 Nov 2025 19:38:13
पवनार, 
subhash-sharma : पहिल्या भूदान चळवळीत भूमीहीनांना जमीन देणे आणि समाजात समानता निर्माण करणे हा होता. परंतु आज खरी समस्या जमीन नसण्याची नाही तर पर्यावरण आणि पृथ्वी वाचवण्याची आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनाची गरज असल्याचे आवाहन ज्येष्ठ विचारवंत सुभाष शर्मा यांनी केले. पवनार येथे मित्र मिलन सोहळ्याच्या प्रथम सत्रात विचारमंथन करताना ते बोलत होते. यावेळी पवनार आश्रमचे ज्येष्ठ गांधी-विनोबा विचारवंत गौतम बजाज, ज्योतीबहन, मिनीबहन, रेखाबहन, शाहाजापूर आश्रमाचे रमेशभाई, पराग चोलकर, मनोरमाबहन, ललिताबहन यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
 
jh
 
 
 
शर्मा पुढे म्हणाले की, आज जगासमोर अनेक गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्यात सर्वात भयावह समस्या म्हणजे लायमेट चेंज. वातावरणातील अनियमितता, तापमानातील वाढ, आणि पर्जन्यमानात आलेली उलथापालथ यामुळे विनोबांनी मांडलेली ‘खुशल समाज’ संकल्पना प्रत्यक्षात संकटात सापडली आहे. वाढते प्रदूषण, निसर्गाचा असमतोल आणि हवामानातील बदल या सर्वांचा परिणाम मानवी जीवनावरच नव्हे तर संपूर्ण सृष्टीवर होत असल्याचे ते म्हणाले.
 
 
शिक्षणाचे व्यापारी स्वरूप वाढत आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणाचे संकल्पनात्मक स्वरूप हरवत चालले असून ज्ञानदानाच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दूषित वातावरणामुळे दरवर्षी जगभरात १५ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांवर पर्यावरणीय संकटांचे दुष्परिणाम दिसत असल्याचे सांगितले.
 
 
रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे पृथ्वीच्या आरोग्याचा मोठा र्‍हास झाला आहे. करोडो वर्षांची पृथ्वी केवळ शंभर वर्षांत आपण प्रदूषित आणि असंतुलित करून टाकली. जमिनीचे पोत बिघडले, सुपीकता कमी झाली, भूजल पातळी खोल जात गेली आणि पाऊस आला तरीही पृथ्वीचे तापमान कमी होत नाही, असे ते म्हणाले. जमिनीतील ‘अंधार’ म्हणजे भूमिगत उष्णता धोकादायक पातळीवर गेली असून भविष्यात चांगले जीवन जगणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांनी वृक्षतोड, पक्षी-किड्यांचे लोप, नैसर्गिक चक्र तुटणे यामुळे शेती आणि पर्यावरण दोन्ही अनियंत्रित झाल्याचेही सांगितले.
 
 
शर्मा यांनी ‘नवीन भूदान’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. पहिले भूदान भूमीहीनांसाठी होते आज नवे भूदान म्हणजे पृथ्वी वाचवण्यासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक पुनरुज्जीवन. माती, पाणी, हवा, वनस्पती, प्राणी-पक्षी आणि सूक्ष्मजीव यांचे अस्तित्व जपणे हेच आजचे भूदान आहे, असे ते म्हणाले. यावेळी देशभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती गावातीलही नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0