अमरावती,
sunil-chauthmal-join-bjp : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सेवा, सुशासन, गरीब कल्याणाच्या विचारांनी प्रेरित होत शनिवारी (ता.१५) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, निवडणूक प्रमुख खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चौथमल यांचा भाजपचा दुपट्टा देत पक्षप्रवेश करून घेण्यात आला.
धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांच्या या विशेष पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, महामंत्री गोपाल चंदन,डॉ. विलास कविटकर, सुधीर रसे, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर, श्याम गंगराळे, आप्पा पाटील, साबुलाल पाटणकर, सुमित चावरे, यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहत चौथमल यांचे जंगी स्वागत केले.
धारधी नगरपंचायत क्षेत्रात सुनील चौथमल यांचे मोठे बलस्थान आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना त्यांनी युवकांचे संघटन या क्षेत्रात मजबूत करण्याचं मोठं कार्य उभं केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या चौथमल कुटुंबीयांचे धारणी नगरपंचायत क्षेत्रात मोठी ताकद आहे. ही बाब लक्षात घेता त्यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल भारतीय जनता पक्षासोबत करायची आहे, असा संकल्प करत नवनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. चौथमल यांचं भाजपचा दुपट्टा देत आमदार संजय कुटे, खासदार डॉ.अनिल बोंडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार राजेश वानखडे, आमदार केबलराम काळे, प्रभुदास भिलावेकर यांनी स्वागत केलं. चौथमल यांना भाजप धारनी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवणार असल्याचे देखील माहिती आहे.