व्हिएतनाम येथील नृत्य स्पर्धेत डॉ. वीरा आणि गंधालीचे सुयश

15 Nov 2025 20:22:14
तभा वृत्तसेवा
कळंब, 
vietnam-dance-competition : ‘इंडियाज इंटरनॅशनल ग्रुव्ह फेस्ट 2025 व्हिएतनाम’ आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत इंदिरा महाविद्यालयातील प्रा. डॉ. वीरा मांडवकर यांनी ‘शास्त्रीय एकल नृत्य’ या प्रकारात तर गंधाली मांडवकर यांनी ‘पाश्चिमात्य एकल नृत्य’ प्रकारात प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले.
 
 
y15Nov-Mandavkar
 
आयआयजीएफतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत निवड झालेल्या अंतिम स्पर्धकांची फेरी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे घेण्यात आली. हनोई येथील छेओ लोककला रंगमंचावर या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून ‘अप्सरा आली’ फेम नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘बनच बलिये’, ‘सुपर डान्सर्स’ या डान्स शो मध्ये राष्ट्रीय स्तरावर नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रभावी कामगिरी करणारे वैभव घुगे, आयआयजीएफ च्या संचालक, नृत्य दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर मेघा संपत उपस्थित होत्या.
 
 
यूएसए, युके, यूएई, मॉरिशस, ओमान अशा विविध देशांतून आणि भारतातील दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, हैद्राबाद, नागपूर, पुणे, मुंबई, कोलकाता, जयपूर अशा विविध शहरांतून जवळपास 360 स्पर्धक सादरीकरणासाठी आले होते. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत डॉ. वीरा आणि गंधाली यांनी पारितोषिकच प्राप्त केले नाही तर परिक्षकांची विशेष वाहवाही मिळवली.
 
 
डॉ. वीरा मांडवकर यांनी कथक नृत्याचे प्रशिक्षण यवतमाळ येथील सृष्टी नृत्य निकेतनच्या संचालक शीतल लचके यांच्याकडे घेतले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डॉ. वीरा यांनी पारितोषिके प्राप्त केली आहेत.
 
 
इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे मराठी विभागप्रमुख असलेल्या प्रा. डॉ. वीरा आपल्या नृत्यकला छंदाला जोपासतात आणि त्यात वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करून कथक नृत्याच्या प्रसारासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या या उपक्रमाचे आणि यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत असते. त्याचप्रमाणे गंधाली या म्हैसूर येथे इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असून आपल्या व्यस्त दिनक्रमातून त्या आपला नृत्यछंद जोपासतात.
 
 
डॉ. वीरा आणि गंधाली यांनी आपल्या यशाचे श्रेय इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, शकुंतला डहाळकर यांना दिले. दोघींच्या या यशाबद्दल इंदिरा महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सृष्टी नृत्य निकेतनच्या सर्व विद्यार्थिनींनी त्यांचे कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0