फिरता फिरता
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
municipal-elections : गेल्या चार वर्षांपासुन नगर पालिकेच्या निवडणुका कधी असा प्रश्न राजकारणाची ‘चव’ लागलेले विचारत होतो. राजकीय आणि न्यायालयीन घडामोडीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आणि तिकिटांकरिता सर्वच पक्षातील इच्छूकांची तगमग सुरू झाली होती. आता निवडणुका तोंडावर आल्यानंतर वर्धेत एका इच्छूकाने झाडू हाती घेत प्रचाराचा फंडा वापरल्याचा फोटो आता समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राजकारण ही नशा आहे. अनेकांच्या ही नशा डोयात गेलेली असते तर काही जण मातीशी जुळून काम करीत असल्याने त्यांनी नागरिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. पण, अशांची संख्या बोटावर मोजण्या इतपतच ठरते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चाहूल लागताच इच्छूकांनी परीट घडीचे पांढरे सदरे बाहेर काढले. गेल्या तीन वर्षांपासुन सण, समारंभ आणि स्पर्धांकरिता आर्थिक मदत देण्यासाठी हात आखुडते घेतलेल्यांनी पोळ्यापासुन मदतीसाठी हात मोकळे सोडले होते. गणपतीच्या जेवनांपासुन सुरू झालेला हा गाव नेत्यांचा प्रवास नवरात्रात दुर्गा मंडळांमध्ये भेटीगाठी आणि पुढे दसरा आणि दिवाळीपर्यंत सलग सुरूच होता. दिवाळी संपताच नगर पालिका निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांकडे तिकीट देण्याची जबाबदारी असेल त्यांच्या आजूबाजूला राहत नेत्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला. आरक्षण निघाल्यानंतर अनेक प्रभाग महिलांकरिता राखीव झाल्याने ‘मी नाही तर माझी घरवाली’ असा प्रयत्न सुरू झाला.
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, देवळी, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी रेल्वे येथे नगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. यावेळी नगराध्यक्ष थेट मतदारांमधून निवडायचा आहे. त्यामुळे भाजपा, महाविकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाकरिता उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. ८३ प्रभागातून १६६ नगरसेवकपदाकरिता ही निवडणूक होणार आहे. सोमवारी १०० टके उमेदवार जाहीर होतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर निवडणूक चिन्ह देण्यात देण्यात येतील. त्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकीत रंगत येईल आणि प्रचारात नवनवीन युत्या शोधल्या जातील तेव्हा जातील. पण, वर्धेतील आर्वी नाका परिसरात एका इच्छूकाने चक रस्ता साफ करतानाचा फोटो फेसबुकवर टाकला. त्यानंतर या फोटोने समाजमाध्यमांवर चांगलीच धूम केली. परंतु, वर्धेचा विकास म्हणजे नाल्या, रस्ता एवढाच मर्यादीत का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.