नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलविण्यासाठी विलंब

16 Nov 2025 19:04:33
कारंजा लाड,
faulty-transformer : तालुक्यातील शेतकरी आज ज्या परिस्थितीतून जात आहेत, ती केवळ तांत्रिक बिघाडाची घटना नाही तर प्रशासनातील निष्क्रियता, महावितरणच्या व्यवस्थेतील पोकळी, आणि शेतकर्‍यांच्या आयुष्याशी खेळणारी प्रणाली यांचे भीषण वास्तव आहे. खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीने उध्वस्त झाली, कर्जाचा डोंगर वाढला तरीही नव्या आशेने रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांनी शेती सज्ज केली. पण या महत्त्वाच्या टप्प्यावर गावोगावातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने संपूर्ण रब्बी हंगामावर काळी छाया पडली आहे.
 
 
 
JKL
 
 
 
कारंजा तालुयात डझनावारी ट्रान्सफॉर्मर जळून गेल्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मोटारपंप बंद आहेत. जिथे पेरणी सुरू आहे, तिथे सिंचन न मिळाल्याने अंकुर सुकण्याच्या मार्गावर आहेत. तर जिथे पेरणी व्हायची आहे, तिथे वीज नसल्याने शेती कोरडी पडली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तोटा भरून काढण्याची एकमेव संधी असलेल्या रब्बी हंगामालाच महावितरणच्या अक्षम्य उदासीनतेने धक्का बसला आहे. जिल्हास्तरावरून सर्व ट्रान्सफॉर्मर अभासी करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, हे आदेश कागदावरच राहिले. काही अधिकार्‍यांनी कामात कूचराई केली, तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि परिणामी ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम कासव गतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
परिणामी शेतकर्‍यांचे अर्ज, फोन, विनंत्या सर्व व्यर्थ जात आहेत. प्रशासनाने डोळेझाक केल्याने शेतात उभ्या पिकांवर मरणाचे सावट दाटले आहे.तर आधीच कर्जबाजारी, नैसर्गिक संकटांनी त्रस्त शेतकरी आता पिके कोमेजताना हताशपणे पाहत आहेत. पिक वाचवा जीव वाचवा अशी ओरड करणार्‍या शेतकर्‍यांना आज वीज यंत्रणेतील भ्रष्टाचार, उदासीनता आणि विलंब यांचा सामना करावा लागत आहे.पिकांच्या अंकुरांना वेळेवर पाणी न मिळणे म्हणजे थेट उत्पादनावर घाव घालण्यासारखे आहे. उशिरा दिलेला ट्रान्सफॉर्मर म्हणजे उशिरा दिलेला मृत्यूदंड ठरू शकतो. हे प्रशासनाला समजत नाही का? असा प्रश्न शेतकरी या निमित्ताने विचारत आहे.
 
 
२४ तासात ट्रान्सफॉर्मर बदलणे गरजेचे
 
 
जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ तासांच्या मर्यादेत बदलण्यासाठी विशेष आपत्कालीन पथक असणे आवश्यक असून, गावनिहाय ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे वेळापत्रक जाहीर करणे, शेतकर्‍यांच्या हेल्पलाईनवर तत्काळ प्रतिसाद देणे, जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करणे, अशा उपाययोजना राबविण्याची गरज आहे. नाहीतर, महावितरणच्या निष्क्रियतेने रब्बी हंगाम धोयात आल्यावाचून राहणार नाही.
Powered By Sangraha 9.0