तृतीय पंथीयांचे बळजबरीने धर्मांतरण

16 Nov 2025 19:18:48
अमरावती, 
forced-conversion : हिंदू धर्मीय तृतीय पंथीयांचे बळजबरीने अन्य धर्मात धर्मांतरण करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराबाबत तात्काळ कारवाई करावी व राजापेठ बजरंग टेकडी येथील हिंदू तृतीय पंथीयांवरील हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे. दरम्यान, अमरावतीमधील या गंभीर प्रकरणानंतर आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
AMT
 
 
 
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये व पत्रकारांशी संवाद साधतांना हा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांच्या समवेत किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री मातंगी नंदागिरी आणि इतर तृतीयपंथी उपस्थित होते. डॉ. बोडे यांनी सांगितले की, मातंगी नंदागिरी यांनी या गंभीर प्रकारची माहीती आपणास शुक्रवारी दिली. त्या प्रचंड घाबरल्या होत्या. परंतु, आपण त्यांना घाबरू नये, आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली. महामंडलेश्वर श्री श्री माँ मातंगी नंदागिरी आणि त्यांच्या शिष्यांचे बळजबरीने अन्य धर्मात धर्मांतरण करण्यात आले होते. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात मातंगी नंदागिरी या पुन्हा हिंदू धर्मात धर्मांतरीत झाल्या असून महामंडलेश्वर झाल्या आहेत.
 
 
राजापेठ बजरंग टेकडी येथील मंदिर परिसरात साबनपुरा येथे मातंगी नंदागिरी व तृतीयपंथीय यांच्यावर अन्य धर्मीय तृतीयपंथीयांनी तलवारीने हल्ला केला होता. याप्रकरणात पोलीसांनी गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई केली नाही. सर्व प्रकार पोलीसांसमोर घडला आहे. पोलीसांनी तृतीयपंथीयंचे धर्मांतरण तात्काळ थांबवावे व तृतीय पंथ्यांना संरक्षण दयावे,अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली. यावेळी मां मातंगी नंदागिरी यांचेसह इतर तृतीयपंथी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी महामंडलेश्वर मां मातंगी नंदागिरी यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या धर्मांतरणाची माहीती दिली. २०२३ मध्ये अचलपुर येथे त्यांचे व त्यांच्या शिष्या किंजल पाटील यांचे अन्य धर्मांत धर्मांतरण करण्यात आले होते. याबाबतचे शासकीय कागदपत्र देखील तयार केले. मात्र कुंभमेळ्यात आपण हिंदू धर्मात परत आल्यानंतर त्यांचा आपल्यावर राग असल्याचे मां मातंगी नंदागिरी यांनी सांगितले. धर्मांतरणासाठी ब्रेन वॉश करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0