नोंदणीच्या तुलनेत निम्मेच मजूर कामावर

16 Nov 2025 19:16:36
गोंदिया, 
registration-of-laborers-mnrega : महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही ग्रामीण मजुरांना रोजगार देण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात ९ लाख १४ हजार ५४४ मजुरांनी नोंदणी केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ४ लाख ५२ हजार मजूर सक्रियपणे काम करत आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगार कुटूंब मनरेगा जॉब कार्ड तयार करून स्वतःची नोंदणी करतात. परंतु मनरेगाच्या कामावर जात नाही, हे त्यामागचे कारण असल्याचे बोलल्या जाते.
 
 
 
MANREGA
 
 
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा मुख्य उद्देश गावातील ग्रामीण मजुराना रोजगार उपलब्ध करून देणे आहे. या योजनेचे एक फायदेशीर वैशिष्ट्य म्हणजे ते १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देऊन कुटूंबातील एका सदस्याला १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध केला जातो. शिवाय ज्या मनरेगा कामगारांचे जॉब कार्ड तयार केले आहेत, त्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देखील दिला जातो. गोंदिया जिल्ह्यात ४ हजार ५३१ मनरेगा जॉब कार्डतयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये ९ लाख १४ हजार ५४४ कामगारांची नोंदणी झाली आहे. तथापी प्रत्यक्षात फक्त ४ लाख ५२ हजार मजूर मनरेगा कामावर येत आहेत. त्यामुळे नोंदणीच्या तुलनेत मनरेगा रोजगारासाठी येणार्‍या मजुरांच्या संख्येवर प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
जिल्ह्यात मनरेगा कार्डधारकांची संख्या ४ हजार ५३१ आहे. या कार्डामध्ये ९ लाख १४ हजार ५४४ मजुरांचा समावेश आहे. यापैकी ४ लाख ५२ हजाराहून अधिक मजूर सक्रिय आहेत. मनरेगा अंतर्गत कामाची कमतरता नाही. काम शोधणार्‍यांना काम उपलब्ध करून दिले जाते.
- डी. एस. लोहबरे
मनरेगा अधिकारी गोंदिया
Powered By Sangraha 9.0