आय.आय.एम. देतेय ऊर्जा व्यवस्थापनाचे धडे

16 Nov 2025 19:36:30
नागपूर,
Bhimaraya Metri : आधुनिक काळात ‘ऊर्जा’ हेच खरे बळ आणि खरी सत्ता असणार आहे. भारताला विकसित राष्ट्र व्हायचे असेल तर ऊर्जेचे हे बळ निर्माण करून देतील अशा सक्षम व्यवस्थापकांची गरज आहे. भविष्यासाठी ही व्यवस्थापक घडवण्याचे काम आय.आय.एम. करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम.)चे संचालक डॉ. भिमाराया मेत्री यांनी केले.
 
 
 
bhimrai-maitree
 
 
 
आय.आय.एम. नागपूरतर्फे वैशिष्ट्य पूर्ण अश्या ‘एग्झिक्युटिव्ह एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंट’ म्हणजेच ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रातील स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीर माधों सिंह भंडारी उत्तराखंड तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कूलगुरू डॉ. त्रिप्ता ठाकूर होत्या. तसेच व्यासपीठावर प्रा. निकुंजकुमार जैन, प्रा. प्रशांत गुप्ता, डॉ. इंदू महेश्वरी उपस्थित होते.
 
ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (एन.टी.पी.आय.) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडी मध्ये देशातील १६ राज्यांमधील ४३ व्यावसायिकांचा समावेश असल्याने हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाचा ठरला आहे. एकूण १६८ अर्जांपैकी गुणवत्ता अनुभवाच्या आधारे ४३ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
 
 
वीज उत्पादन क्षमतेत वाढ
 
 
मुख्य भाषणात डॉ. ठाकूर म्हणाल्या, खेड्यांसह दुर्गम भागात सुद्धा सर्वत्र वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्टय भारताने साध्य आहे. परंतु आता पुढील ध्येय चोवीस तास दर्जेदार वीज उपलब्ध करणे हे असणार गेल्या काही वर्षांत भारताची वीजउत्पादन क्षमता १०० गीगावॉट वरून ५०० गीगावॉट पर्यंत वाढली असून पुढील १०ते१५ वर्षांत ही याहीपेक्षा दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे.
 
 
ऊर्जा व्यवस्थापनात प्रावीण्य
 
 
तत्पूर्वी आपल्या भाषणात डॉ. मेत्री यांनी भारत वेगवान आर्थिक वाढीच्या निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगितले. प्रति व्यक्ती वीजवापर झपाट्याने वाढत आहे. विकसित राष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत असताना ऊर्जा व्यवस्थापनात प्रावीण्य असलेले अत्यंत सक्षम नेतृत्व तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
 
 
अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता प्रा. निकुंज कुमार जैन यांनी देशभरातून या अभ्यासक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. यातील ५५टक्के विद्यार्थी ही सार्वजनिक क्षेत्रातून आणि ४५टक्के खासगी क्षेत्रातून आहेत. सर्व ५०टक्के वीज निर्मिती व वितरण क्षेत्रातून, २५टक्के ऊर्जा आणि सस्टेनेबिलिटी क्षेत्रातून, १०टक्के तेल आणि नैसर्गिक वायु क्षेत्रातून आले आहेत, तर उर्वरित सल्लागार सेवा, खनिज क्षेत्र आणि उद्योजकतेतून आहेत.
Powered By Sangraha 9.0